Join us

घराचे बांधकाम महागले, स्टील, सिमेंट आणि वाळूचे भाव वाढल्याचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 03:29 IST

Mumbai News : मुंबईत काही ठिकाणी बांधकाम साहित्याचे दर वाढल्यामुळे व्यापाऱ्यांनी मर्यादित साहित्याचा साठा करून ठेवला आहे. त्यात लॉकडाउनच्या काळात वाहतुकीवर झालेल्या परिणामामुळे इतर राज्यातून येणारे साहित्य कमी प्रमाणात उपलब्ध आहे.

 मुंबई : कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाउनमुळे अनेक व्यवसाय संकटात सापडले आहेत. त्यातच घरांच्या बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यांचे दरही गगनाला भिडल्याने आता घराचे बांधकाम करणेही महाग झाले आहे. वाळू, गिट्टी, वीट, स्टील व सिमेंट यांच्या दरांमध्ये लॉकडाउनच्या नंतर जवळपास १० ते १५ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. यामुळे नव्याने घराचे बांधकाम करणाऱ्या नागरिकांना या महागाईला सामोरे जावे लागत आहे. मुंबईत काही ठिकाणी बांधकाम साहित्याचे दर वाढल्यामुळे व्यापाऱ्यांनी मर्यादित साहित्याचा साठा करून ठेवला आहे. त्यात लॉकडाउनच्या काळात वाहतुकीवर झालेल्या परिणामामुळे इतर राज्यातून येणारे साहित्य कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यात वाळू उपसा करणारी मशीन व क्रशर मशीन तसेच त्यासाठी लागणारे केमिकल्स व कच्चा माल यांचेसुद्धा दर वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांना हव्या तेवढ्या प्रमाणात साहित्य उपलब्ध नाही. यामुळे बांधकाम करणाऱ्यांची चारही बाजूंनी कोंडी झाल्याचे चित्र दिसत  आहे. 

बांधकाम साहित्याचे दर का वाढले?लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय ठप्प होते. यामुळे बांधकाम साहित्य बनवण्याचे कारखाने व मशीन यादेखील बंद होत्या. सर्व मजुरांनी घरची वाट धरल्याने काम करण्यासाठी मजुरांचा तुटवडा भासत होता. आजही या क्षेत्रात पन्नास टक्के मजुरांचा तुटवडा भासत आहे. लॉकडाउन मुळे वाहतूक ठप्प असल्याने बरेच साहित्य इतर राज्यात अडकून पडले होते. मुंबईत बांधकाम साहित्याची मागणी वाढली आहे. परंतु त्या तुलनेत बांधकाम साहित्याचा पुरवठा कमी होत आहे.  

या महागाईमुळे अनेकांचे घर बांधकामाचे बजेट कोलमडले आहेत. यामुळे बांधकामांनाही उशीर होत आहे. बांधकाम साहित्याचे वाढलेले दर त्यात कामगारांना द्यावी लागणारी मजुरी यांचा ताळमेळ बसत नसल्याने अनेकांनी घरांचे बांधकाम पुढे ढकलले आहे. 

डिझेलचे वाढलेले दर, मजुरांची कमतरता तसेच बांधकाम साहित्याचा तुटवडा यामुळे साहित्याचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढले. यामुळे बांधकाम व्यवसायिक तसेच ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे. २०२१ मध्ये हे दर स्थिर होण्याची आशा आहे.- अभयराज यादव, बांधकाम साहित्य विक्रेता

टॅग्स :घरव्यवसायमुंबई