‘स्वामी’ची कृपा; रखडलेल्या ८७ हजार घरांच्या बांधकामाला अखेर चालना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 02:26 AM2020-12-02T02:26:43+5:302020-12-02T02:27:53+5:30

फंडातील अर्थसाहाय्यामुळे प्रकल्पांची कामे सुरू

Construction of 87,000 stalled houses finally underway; The grace of ‘Swami’ | ‘स्वामी’ची कृपा; रखडलेल्या ८७ हजार घरांच्या बांधकामाला अखेर चालना

‘स्वामी’ची कृपा; रखडलेल्या ८७ हजार घरांच्या बांधकामाला अखेर चालना

Next

मुंबई :  कोरोना संक्रमण आणि बांधकाम व्यावसायिकांच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे रखडलेल्या प्रकल्पांना केंद्र सरकारने स्पेशल विंडो फाॅर अफोर्डेबल ॲण्ड मिड इन्कम हाऊसिंग फंडातून (स्वामी) अर्थसाहाय्य देण्यास सुरुवात केली आहे. १३६ प्रकल्पांना कर्ज मंजूर झाले असून त्यापैकी ३६ ठिकाणी कर्ज वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे सुमारे ८७ हजार रखडलेल्या घरांचे बांधकाम सुरू झाले असून त्यात गुंतवणूक करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

मध्यम आकाराच्या आणि परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांमध्ये आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असतील तर त्या दूर करण्यासाठी नोव्हेंबर, २०१९ मध्ये केंद्र सरकारने स्वामी फंड उभारण्यास मान्यता दिली होती. कोरोना संकट काळात हा निधी अंतिम टप्प्यात रखडलेल्या काही प्रकल्पांसाठी वरदान ठरला. पहिल्या टप्प्यात किमान २५ हजार कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर होईल अशी अपेक्षा आहे. त्यापैकी सुमारे १३ हजार कोटींच्या अर्थसाहाय्याला मंजुरी देण्यात आली आहे.

अर्थसाहाय्यासाठी ३५० पेक्षा जास्त प्रकल्पांचे अर्ज सरकारकडे दाखल झाले आहेत. मंजुरी मिळालेल्यांपैकी ३६ प्रकल्पांसाठी प्रत्यक्ष निधी उपलब्ध झाला असून त्यांचे काम सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सर्वाधिक प्रकल्प महाराष्ट्रात आहेत. मुंबईतील चार आणि ठाणे-पुण्यातील प्रत्येकी एक प्रकल्पाचा समावेश आहे.

‘त्या’ प्रकल्पाचे ९५ टक्के काम पूर्ण
बोरीवली येथील सीसीआय प्रकल्पाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले असून हवालदिल झालेल्या गुंतवणूकदारांच्या तक्रारी आणि परताव्याची मागणी करणाऱ्या याचिका महारेराकडे दाखल होत आहेत. या प्रकल्पाचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून केंद्र सरकारच्या अर्थसाहाय्यामुळे रखडलेले उर्वरित काम येत्या काही महिन्यांत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. याच धर्तीवर अन्य प्रकल्पसुद्धा मार्गी लागतील आणि तिथे गुंतवणूक करणाऱ्या कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
 

Web Title: Construction of 87,000 stalled houses finally underway; The grace of ‘Swami’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.