मुंबई : कुलाबा- वांद्रे- सीप्झ या मेट्रो-३ भूमिगत मार्गिकेवरील २६ मेट्रो स्थानकांच्या बांधकामाला वेग आला आहे. या मार्गिकेतील भुयारी मेट्रो स्थानकांचे बांधकाम सरासरी ४६ टक्के झाले असून ३२ पैकी २८ टनेलचे काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसीएल) पूर्ण केले आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ या भुमिगत मार्गिकेपैकी ८२ टक्के भूमिगत मार्गिका तयार झाल्यावर आता एमएमआरसीएलने या मार्गिकेतील भूमिगत स्थानकांच्या बांधकामांचा वेग वाढवला आहे. मेट्रो-३ मार्गिकेतील २६ स्थानकांमधील सात स्थानकांचे ६० टक्क्यांपेक्षा जास्त काम झाले आहे. तर दोन स्थानकांचे ७० टक्क्यांपेक्षा जास्त आणि सात स्थानकांचे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण करण्यात आले आहे.एमआयडीसी मेट्रो स्थानकाचे काम ७७ टक्के आणि विधानभवन स्थानकाचे काम ७२.६० टक्के झाले आहे. तर सीप्झ, मरोळ नाका, आंतरदेशीय विमानतळ, सांताक्रुझ, शीतलादेवी, सीएसएमटी आणि सिद्धिविनायक स्थानकांचे ६० टक्क्यांपेक्षा जास्त काम झाले असल्याचे एमएमआरसीएलने स्पष्ट केले आहे.कुलाबा-वांद्रे-सीप्झदरम्यान तयार होत असलेली ३३ किमी लांबीची भूमिगत मेट्रो मार्गिका दोन टप्यांमध्ये सुरू करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. आरे कॉलनी ते बीकेसी या पहिल्या टप्प्यामध्ये डिसेंबर २०२१मध्ये आणि कुलाबा-वांद्रे-सीप्झ या संपूर्ण मार्गिकेवर जून २०२२ पर्यंत मेट्रो सुरू करण्याची योजना एमएमआरसीने बनवली आहे. एमएमआरसीएलमार्फत जूनपासून आरे ते बीकेसी दरम्यानच्या मार्गिकेवर रूळ टाकण्याच्या कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. या कामासाठी लार्सन अॅन्ड टुब्रो लिमिटेड (एलएनटी कंस्ट्रक्शन) या कंपनीसोबत आधीच करार केला आहे. यानुसार कंपनीला डिझाईन, खरेदी, आपूर्ती, रूळ टाकणे, परीक्षण करणे अशी कामे करावी लागणार आहेत.२८ टनेल तयार३३ किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गिकेवर एकूण ३२ टनेल तयार होत आहेत. टनेल बोरिंग मशीनच्या (टीबीएम) सहाय्याने ३२ पैकी २८ टनेलचे काम पूर्ण करण्यात आले आहे. जमीनीवरून खाली २८ मीटर मार्गिकेच्या बांधकामासाठी सतरा टीबीएमचा वापर करण्यात येत आहे. आत्तापर्यंत ८२ टक्के भुयारीकरणाचे काम झाले असून काही महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे एमएमआरसीएलचे लक्ष्य आहे.
मेट्रो-३ मार्गिकेतील २६ भुयारी स्थानकांच्या बांधकामाला वेग, ४६ टक्के स्थानकांचे तर २८ टनेलचे काम पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 04:46 IST