Join us  

Sanjay Raut : महाराष्ट्र आणि बॉलिवूडला बदनाम करण्याचा कट; एसआयटीमार्फत चौकशी करावी - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 6:47 AM

Sanjay Raut : एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या कारवाईचे काही व्हिडीओ समोर आल्यानंतर, संजय राऊत यांनी एनसीबीसह केंद्रीय यंत्रणांवर जोरदार हल्लाबोल केला.

मुंबई : अमली पदार्थाच्या निमित्ताने महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईत सिनेसृष्टी आहे आणि ते मुंबईचे वैभव आहे. एनसीबीच्या माध्यमातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही सिनेसृष्टी महाराष्ट्रातून निघून जावी अशा प्रकारचे प्रयत्न काही लोक करत आहेत, असा आरोप शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी केला. राज्य सरकारने या सर्व प्रकरणांची स्युमोटो दखल घेत विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करावी, अशी मागणीही राऊत यांनी केली.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या कारवाईचे काही व्हिडीओ समोर आल्यानंतर, संजय राऊत यांनी एनसीबीसह केंद्रीय यंत्रणांवर जोरदार हल्लाबोल केला. अमली पदार्थाच्या निमित्ताने महाराष्ट्राला बदनाम करण्याची काही लोकांनी सुपारी घेतल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी केला होता. तो खरा असल्याचे आता सिद्ध झाले आहे. आज समोर आलेले दोन दोन व्हिडीओ बोलके आहेत. लपवाछपवी करण्याची गरज नाही. या सर्व प्रकरणाची महाराष्ट्र सरकारने चौकशी करायला हवी. एनसीबी सारख्या केंद्रीय यंत्रणा कुणाच्या दबावाखाली मुंबईत काम करतात, राज्याला बदनाम करतात, हे देशाला कळायला हवे, असे संजय राऊत म्हणाले. 

एसआयटी चौकशी करासुशांत सिंगच्या मृत्यूनंतर एनसीबी नावाचा प्रकार मुंबई महाराष्ट्रात फारच कामाला लागल्याचे सांगून राऊत म्हणाले की, या राज्याचे लोक अफू-गाजांचा व्यापार करतात, अशी एक बदनामी देशभरात सुरू आहे. मलिक सातत्याने एनसीबीच्या कारवाईवर पुराव्यासह प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. राज्य मंत्रिमंडळाने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला हवे.  मलिक यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली असून, राज्य सरकारने विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले.

टॅग्स :संजय राऊतबॉलिवूड