Join us

सलमान खानला दिलासा; प्ले स्टोरवरील ‘सेलमोन भोई’ गेमवर तात्पुरती बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 22:12 IST

Temporary ban on 'Salmon Bhoi' game on Play Store : सलमान खानने या गेमविरोधात न्यायालयात धाव घेतली होती.

ठळक मुद्दे न्यायालयाने या गेमची निर्मिती करणारी कंपनी पॅरोडी स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेडला गुगुल प्ले स्टोर आणि इतर प्लॅटफॉर्मवरून हा गेम त्वरित काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई सिव्हिल कोर्टाने प्ले स्टोरवरील ‘सेलमोन भोई’ या गेमवर तात्पुरती बंदी घातली आहे. तरुणाईमध्ये नुकताच प्रसिद्ध झालेला हा गेम सलमान खानच्या हिट अ‍ॅण्ड रन तसेच काळवीट प्रकरणावरून तयार करण्यात आला आहे. त्यामुळेच सलमान खानने या गेमविरोधात न्यायालयात धाव घेतली होती.

सलमान खानचे चाहते त्याला सलमान भाई म्हणतात आणि या गेमचं नाव देखील काहीस साधर्म्य असणारं सेलमोन भोई असं असल्याने सलमानच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचत असल्याचा आरोप सलमानने न्यायालयात केला आहे. सलमान खानच्या वकिलांच्या युक्तीवादानंतर न्या. के एम जयस्वाल यांनी या गेमवर तात्पुरती बंदी घालण्याचे सोमवारी आदेश दिले आहेत. या गेमची रचना आणि त्यातील अनेक गोष्टी या सलमान खानशी संबधीत असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे. तसेच हा गेम बनवणाऱ्या कंपनीने सलमान खानची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे न्यायालयाने या गेमची निर्मिती करणारी कंपनी पॅरोडी स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेडला गुगुल प्ले स्टोर आणि इतर प्लॅटफॉर्मवरून हा गेम त्वरित काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर या गेममध्ये आवश्यक ते बदल करून हा गेम पुन्हा लॉन्च करावा असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. हा गेम काल्पनिक असल्याचा दावा संबंधित कंपनीने केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० सप्टेंबर होणार आहे.

टॅग्स :सलमान खानगुगलन्यायालयमुंबईवकिल