Join us

दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रोच्या डेपो मार्गात बदल करण्याचा विचार; ६०० कोटींच्या बचतीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 06:07 IST

यापूर्वी या मेट्रो मार्गिकेचे शेवटचे स्थानक मीरा-भाईंदर येथील सुभाषचंद्र बोस स्टेडियम होते, तर राई-मुर्धे येथे कारशेड उभारले जाणार होते

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेच्या सुभाषचंद्र बोस स्थानकापासून उत्तनपर्यंतच्या मार्गात बदल करण्याच्या हालचाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केल्या आहेत. राई-मुर्धे आणि मोरवा गावातून ही मार्गिका घेऊन जाण्याऐवजी सुभाषचंद्र स्थानकापासून मिठागरांच्या जमिनीवरून उत्तनपर्यंत नेण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे ६०० कोटी रुपयांची बचत होईल, असा दावा करण्यात येत आहे.   

यापूर्वी या मेट्रो मार्गिकेचे शेवटचे स्थानक मीरा-भाईंदर येथील सुभाषचंद्र बोस स्टेडियम होते, तर राई-मुर्धे येथे कारशेड उभारले जाणार होते. मात्र त्याला स्थानिकांचा विरोध होता. त्यामुळे उत्तनला डोंगरी येथे कारशेड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी राज्य सरकारने एमएमआरडीएला जागा दिली आहे, तर एमएमआरडीएने खासगी मालकीच्या २.४ हेक्टर जागेची अधिग्रहण प्रक्रिया सुरू केली आहे. 

मार्गिका जाणार मिठागरांच्या जमिनीवरून  

यापूर्वीच्या नियोजनानुसार सुभाषचंद्र बोस ते उत्तनदरम्यान नव्याने दोन स्थानके उभारण्यात येणार होती. या दोन स्थानकांसाठी सुमारे १६० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र नव्या नियोजनानुसार ही मेट्रो मार्गिका पाणथळ आणि मिठागराच्या जमिनीवरून नेली जाणार आहे. या भागात लोकवस्ती अधिक नसल्याने मेट्रो स्थानक उभारण्याची गरज नाही. त्यातून खर्चातही बचत होईल. तसेच मेट्रो स्थानकापर्यंतचे अंतरही कमी होईल.

टॅग्स :मेट्रोमुंबई