Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाळूमामा देवस्थानासाठी विशेष कायद्याचा विचार, देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 11:30 IST

गैरकारभाराबाबतची माहिती मागविली

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी विशेष कायदा करण्याबाबत धर्मादाय आयुक्तांकडून काही मुद्द्यांबाबत माहिती मागविली असून, त्या अनुषंगाने छाननी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिरासंदर्भात शासनाकडून विशेष कायदा करण्यात आलेला आहे. या कायद्याप्रमाणे श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी कायदा करण्यात यावा, याबाबत सदस्य गोपीचंद पडळकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, श्री संत बाळूमामा यांचे महाराष्ट्र व कर्नाटकात भाविक आहेत. या भाविकांसाठी सोयी-सुविधा पुरविण्यात येतील. श्री संत बाळूमामा देवस्थानच्या न्यासात सदस्य म्हणून त्यांच्या कुटुंबातील सदस्य व राज्यभरातील भक्तगणांच्या समुदायातील प्रतिनिधीत्वाबाबत योग्य तो विचार केला जाईल. श्री संत बाळूमामा देवस्थानबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दफ्तर हस्तांतर करण्याची सूचना देण्यात येऊन आवश्यकता असेल तर धर्मादाय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येईल. तसेच देवस्थानबाबत वेगळा कायदा करण्यासंदर्भात धर्मादाय आयुक्तांचा अभिप्राय मागविण्यात आला आहे. गैरकारभाराबाबतची माहिती मागविली आहे, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :मुंबईकोल्हापूरबाळूमामाच्या नावानं चांगभलं