शारीरिक संबंध सहमतीनेच, बलात्काराच्या आरोपीला अटकपूर्व जामीन; उच्च न्यायालयाने दिला दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 04:22 IST2017-10-10T03:56:21+5:302017-10-10T04:22:04+5:30
एका ३४ वर्षीय महिलेवर बलात्कार व तिची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या आरोपीचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायलयाने मंजूर केला. महिला सुशिक्षित असून, तिला तिचे चांगले-वाईट समजते

शारीरिक संबंध सहमतीनेच, बलात्काराच्या आरोपीला अटकपूर्व जामीन; उच्च न्यायालयाने दिला दिलासा
मुंबई : एका ३४ वर्षीय महिलेवर बलात्कार व तिची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या आरोपीचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायलयाने मंजूर केला. महिला सुशिक्षित असून, तिला तिचे चांगले-वाईट समजते, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने आरोपीला दिलासा दिला.
गेल्या महिन्यात आरोपीने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. त्याच्यावर भारतीय दंडसंहिता ३७६ (बलात्कार) आणि ४२० (फसवणूक) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. त्याने केलेल्या अर्जानुसार, एकमेकांच्या संमतीने दोघांमध्ये शारीरिक संबंध होते. त्याने कधीही तिच्या मर्जीविरुद्ध तिच्याशी संबंध ठेवले नाहीत. तिची फसवणूक करून तिच्यावर जबरदस्ती केली नाही.
या केसमध्ये पीडितेला पूर्ण माहीत होते की, अर्जदार विवाहित आहे. तरीही तिने त्याच्याशी संबंध ठेवले. पीडिता सुशिक्षित असून, ती मुंबईच्या एका महाविद्यालयात अकाउंटंट म्हणून काम पाहात आहे. अर्जदार विवाहित आहे हे माहीत असूनही तिने घरी एका साधूला बोलावून अर्जदाराशी विवाह केला, असे निरीक्षण न्या. ए. एम. बदर यांनी नोंदविले. तक्रारीनुसार, पीडिता आणि आरोपी सोशल साईटद्वारे भेटले. डिसेंबर २०१६मध्ये ते मुंबईत एकमेकांना भेटले आणि एकत्र राहिले. एकत्र राहिल्यानंतर आरोपीने पीडितेला तो विवाहित असल्याची माहिती दिली. तरीही पीडितेने त्याच्याबरोबर संबंध ठेवले. मे २०१६मध्ये दोघांनीही विवाह केला. मात्र त्यानंतर त्यांचे संबंध बिघडले आणि पीडितेने तक्रार दाखल केली.