Join us

CoronaVirus: उद्या एप्रिल फूल कराल, तर...; गृहमंत्र्यांचा स्पष्ट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 14:11 IST

Coronavirus कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा इशारा

मुंबई: राज्यातील कारोनाग्रस्तांच्या संख्येत वेगानं वाढ होत आहे. कोरोनाबाधितांचा आकडा २३२ वर जाऊन पोहोचला आहे. कोरोनाची बाधा झालेल्या १० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांचा आकडा सातत्यानं वाढत असल्यानं प्रशासनानं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. एक एप्रिलच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.गृहमंत्र्यांनी काही वेळापूर्वीच एक व्हिडीओ ट्विट केला. एप्रिल फूल करण्यासाठी अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर क्राईमच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार असल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं. 'आज ३१ मार्च आहे आणि उद्या आहे एक एप्रिल, म्हणजे एप्रिल फूल. आपण एप्रिल फूलच्या दिवशी दरवर्षी आपल्या सहकाऱ्यांची, मित्रांची चेष्टा, मस्करी करतो. पण आज संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारत देश कोरोनाशी लढतोय. अशा या युद्धजन्य परिस्थितीमध्ये एप्रिल फूलच्या दिवशी आपण कोणत्याही प्रकारची अफवा, कोणत्याही प्रकारची चेष्टा, मस्करी करू नये. यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं. सहकार्य न करणाऱ्यांवर आणि अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर क्राईमच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल,' असा स्पष्ट इशारा देशमुख यांनी दिला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळून आले आहेत. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा २३२ वर पोहोचला आहे. आतापर्यंत १० जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबईत सध्या कोरोनाचे ९८ रुग्ण सापडले आहेत. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याअनिल देशमुख