Join us
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा २८ डिसेंबर रोजी मुंबईत ‘भारत बचाओ - संविधान बचाओ’ फ्लॅग मार्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 19:08 IST

स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी या देशात फोडा आणि राज्य करा हे धोरण राबवले होते तीच परिस्थिती भाजपचे केंद्र सरकार पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

मुंबई काँग्रेस स्थापना दिनानिमित्त संविधान व लोकशाही विरोधी केंद्रातील भाजप सरकारविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने 'भारत बचाओ - संविधान बचाओ' फ्लॅग मार्चचे आयोजन केले आहे.  शनिवार २८ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळक पुतळ्यापर्यंत फ्लॅग मार्च काढण्यात येणार आहे. लोकशाहीवादी धर्मनिरपेक्ष संघटना व कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने या फ्लॅग मार्चमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.गांधीभवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबई येथे काँग्रेसची स्थापना झाली होती. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात धर्मभेद, वंशभेद, प्रांतभेद इ. भेदांवर मात करणारी अखिल भारतीय एकराष्ट्रीयता निर्माण करणे हे सूत्र ठरवण्यात आले. याच सूत्रावर काम करत काँग्रेसने स्वातंत्र्यचळवळ उभी केली, लोकमान्य टिळक, राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली अहिंसक मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली देशाचे संविधान तयार झाले. या संविधानानुसार आपला देश चालतो आहे. पण आज केंद्रातील भाजप सरकारच्या लोकशाहीविरोधी आणि संविधानविरोधी कार्यपद्धतीने देशात धार्मिक आणि सामाजिक फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. देशाची लोकशाही, संविधान, व्यक्तीस्वातंत्र्य, राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव यावर केंद्र सरकारने आघात केला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी या देशात फोडा आणि राज्य करा हे धोरण राबवले होते तीच परिस्थिती भाजपचे केंद्र सरकार पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपा सरकार विरोधात स्वातंत्र्यलढ्याप्रमाणे लढा उभारावा लागणार आहे.

केंद्र सरकार सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. याचा निषेध करण्यासाठी व तरूण, विद्यार्थी व जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस स्थापना दिनी शनिवार २८ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. ऑगस्ट क्रांती मैदान येथे ध्वजारोहण करून ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटी असा भारत बचाओ संविधान बचाओ फ्लॅग मार्च काढण्यात येणार आहे. राज्यभरातही विविध ठिकाणी फ्लॅग मार्च काढण्यात येणार आहेत. हजारो काँग्रेस कार्यकर्ते या फ्लॅग मार्चमध्ये सहभागी होणार आहेत, लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या फ्लॅग मार्च मध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केले आहे.

टॅग्स :काँग्रेसबाळासाहेब थोरातमुंबईराजकारण