मुंबई : भाजपनंतर मुंबई काँग्रेसनेही नालेसफाईच्या कामाची पाहणी सुरू केली, मात्र ही नालेसफाई कामाची पाहणी वांद्रे-धारावीच्या पुढे सरकली नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत सुरू असलेली धुसफूस पक्षाच्या कार्यक्रमांवरही परिणाम करत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची बहीण, धारावीच्या आमदार ज्योती गायकवाड आणि माजी नगरसेवक राजा रहेबार खान यांनी नालेसफाईची पाहणी केली. वास्तविक मोठ्या नाल्यांची संख्या पूर्व-पश्चिम उपनगरात अधिक असून तेथील माजी नगरसेवक, आमदार यांच्याकडून कामाची पाहणी अपेक्षित होती. पण केवळ ज्योती गायकवाड आणि रहेबार खान यांनीच पाहणी केली आणि अध्यक्षांना त्याचा अहवाल दिला. आमदार ज्योती गायकवाड यांनी धारावीच्या वॉर्ड क्र. १८९ मध्ये पालिका अधिकाऱ्यांसह पाहणी केली. त्यांनी केलेल्या पाहणीत खुल्या गटारांमध्ये अजूनही घाण आणि कचरा तसाच असल्याचे निदर्शनास आले.
काही नाल्यांमधून काढलेला गाळ पडूनमहापालिकेचे कर्मचारी वेळेवर हजर राहत नाहीत, काही नाल्यांमधून काढलेला कचरा तसाच पडून आहे, अशा तक्रारी गायकवाड यांनी केल्या. जुने फर्निचर, रद्दी, पडीक वाहने हे अजूनही उचलले गेले नसल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता राखण्याबाबत सूचना दिल्या. रहेबार खान यांनीही वांद्रे पश्चिमेकडील नालेसफाईची पाहणी केली. मुंबई काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी धुसफूस असल्याचा इन्कार करत नालेसफाई पाहणी अन्यत्र सुरू आहे, पण माध्यमांपर्यंत पोहोचत नाही, असा दावा केला.