Join us  

चांदिवलीतील भाजपचे मताधिक्य कमी करण्यात काँग्रेसला यश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2019 1:34 AM

महाजन यांना दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य - काँग्रेसची पकड कायम

खलील गिरकरविधानसभा । चांदिवलीउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील चांदिवली मतदारसंघात भाजपच्या खासदार पूनम महाजन यांना १ लाख ९९८ मते मिळाली आहेत तर काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांना ७३ हजार ७४३ मते मिळाली आहेत. काँग्रेसचे माजी मंत्री व विद्यमान आमदार आरिफ नसीम खान विधानसभेत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या मतदारसंघात भाजप उमेदवाराला २७ हजार २५५ मतांचे मताधिक्य मिळाले आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ या एकमेव मतदारसंघात काँग्रेसचा आमदार आहे. उत्तर भारतीय व अल्पसंख्याकबहुल असलेल्या या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या ए.आर. अंजारीया यांना ८२३८ मते मिळाली आहेत. वंचित आघाडीला लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त मते याच मतदारसंघात मिळाली आहेत. या निकालामुळे काँग्रेस आमदार आरिफ नसीम खान यांनी मतदारसंघावर आपली पकड असल्याचे सिद्ध केले आहे. भाजपला हा मतदारसंघ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून हिसकावून घेणे सहज शक्य नसल्याचे खान यांनी दाखवून दिले आहे.चांदिवली मतदारसंघ काँग्रेसकडून हिसकावून घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपला जास्त परिश्रम करावे लागतील, अशी चिन्हे आहेत. गत निवडणुकीतदेखील महाजन यांना या मतदारसंघात ३२ हजार ९२३ मताधिक्य मिळाले होते. मात्र विधानसभेला नसीम खान यांनी २९ हजार मताधिक्याने काँग्रेस उमेदवार म्हणून विजय मिळवला होता. खान यांनी शिवसेना उमेदवाराचा पराभव केला होता.

२०१४ मध्ये चांदिवली मतदारसंघात प्रिया दत्त यांना ६३ हजार १६० मते मिळाली होती तर पूनम महाजन यांना ९६ हजार ८३ मते मिळाली होती. त्या वेळी महाजन यांना ३२ हजार ९२३ मताधिक्य मिळाले होते. २०१४ च्या तुलनेत ५६६८ ने मताधिक्य कमी करण्यात काँग्रेसला या वेळी यश आले आहे. चांदिवलीमध्ये लोकसभेसाठी १ लाख ८८ हजार २१८ मतदान झाले. २०१४ ला १ लाख ७२ हजार ८७५ जणांनी मतदान केले होते.राज्यातील व देशातील बदलत्या राजकीय परिस्थितीत चांदिवली मतदारसंघावर पकड ठेवण्यात स्थानिक आमदार खान यांना यश आलेले आहे.

विधानसभेवर काय परिणामकाँग्रेसचे विद्यमान आमदार आरिफ नसीम खान यांची पकड असल्याचे चित्र.भाजप किंवा शिवसेनेच्या उमेदवाराला लोकसभेच्या मतांवर अवलंबून राहता येणार नाही असा इतिहास आहे. लोकसभा व विधानसभेची लढत वेगवेगळी राहण्याची चिन्हे.वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या मतांमध्ये लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मते मिळाली असली तरी त्याचे प्रमाण काँग्रेस व भाजपच्या उमेदवारापेक्षा अत्यंत कमी असल्याने विधानसभेला लढत देण्याची शक्यता कमी आहे.

टॅग्स :भाजपाकाँग्रेसविधानसभा निवडणूक 2019