Vijay Wadettiwar Vidhan Sabha News: संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकून तोंडाला काळे फासले गेले. रविवारी दुपारी श्री फत्तेसिंह शिक्षण संस्था, सकल मराठा समाज यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात हा प्रकार घडला. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. शाईफेक आणि धक्काबुक्कीमुळे गायकवाड कार्यक्रमाला हजेरी न लावता निघून गेले. छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल, भावना दुखावल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते संतप्त झाले होते. यानंतर आता या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट इथे सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड गेले होते. तिथे त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यांना गाडीतून बाहेर खेचून पाडण्यात आले काळे फासण्यात आले. हा त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न होता, असा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
या कार्यक्रमात पोलिस बंदोबस्त का नव्हता?
संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर अमानुषपणे हल्ला झाला. एका पक्षाचा कार्यकर्ता असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याच्यावर पिस्तूल बाळगण्याचा गुन्हा आहे, त्याने चुलत भावाची हत्या केली म्हणून तुरुंगवास ही भोगला आहे. एका पक्षाचा तो कार्यकर्ता आहे पण ह्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. हल्ला होणार यांचे इंटेलिजन्स नव्हते का? या कार्यक्रमात पोलिस बंदोबस्त का नव्हता? असा सवाल वडेट्टीवार यांनी स्थगनच्या माध्यमातून उपस्थित केला.
दरम्यान, यांच्यासाठी कायदा नाही का? गायकवाड हे निर्भिडपणे काम करत आणि त्यांच्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला आहे त्यामुळे कठोर कारवाईची मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी सबंधित आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती सभागृहाला दिली. तसेच या प्रकरणात योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले.