काँग्रेसचे राज्य सचिव विजय पाटील शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 16:45 IST2019-09-12T16:43:43+5:302019-09-12T16:45:00+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या घोषणेला काही तासांचा अवधी बाकी असतानाच वसई तालुक्यातील काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे.

काँग्रेसचे राज्य सचिव विजय पाटील शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत दाखल
-आशिष राणे
वसई/ मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या घोषणेला काही तासांचा अवधी बाकी असतानाच वसई तालुक्यातील काँग्रेसला आणखी एक धक्का बसला असून यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका प्रमुखाचा ही समावेश आहे. काँग्रेसचे राज्य सचिव तथा पूर्वाश्रमीचे आ. हितेंद्र ठाकूर प्रणित बहुजन विकास आघाडीचे पूर्वपट्टीचे खंदे पदाधिकारी व मित्र विजय (शेठ )पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज गुरुवारी दुपारी 1.00 वाजता 'मातोश्री 'वर काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन शिवसेनेत जाहीर रित्या प्रवेश केला आहे.
नवघर पुर्व पट्टीत ससूननवघर गावात वास्तव्यास असलेले विजय (शेठ )पाटील हे सामाजिक, राजकिय क्षेत्रात अग्रेसर असले तरी ते एक यशस्वी उद्योजक आहेत. मागील वर्षभर झाले ते पालघर व ठाणे जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांच्या संपर्कात होते, त्यातच ते वसई विधानसभेतून आमदारकी लढवण्यास बऱ्यापैकी इच्छूक असल्याने पाटलांनी एन शेवटच्या क्षणी उचित वेळ साधत अखेर शिवसेना पक्षात प्रवेश करत सर्वांना धक्का दिला आहे.
त्यातच राज्यातील भाजप-शिवसेना यांची युती देखील या विरारचे बाहुबली म्हणून सुपरिचित असलेल्या बहुजन विकास आघाडीचे विद्यमान अध्यक्ष आम.हितेंद्र ठाकूर यांना शह देण्यासाठी विजय पाटलांना वसई विधानासभेतून लढवण्याची दाट शक्यता या प्रवेशामुळे वर्तवली जात असल्याचे संकेत स्वतः दस्तुरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी पाटलांना शिवबंधन बांधताना 'जा विजय नावसारखाच विजयी हो असे आशीर्वाद दिले.
विजय( शेठ )पाटील हे वसईतील प्रभावी राजकीय नेते असून आग्री, वाढवळ, ख्रिश्चन आदी समुदायांचा त्यांच्या पाठीशी तसा एक चांगला जनाधार असल्याचंही बोललं जातं. पाटील हे वसईतील एक मोठे उद्योजक आहेत. त्यांना स्वच्छ प्रतिमेचा व शांत, संयमी असा राजकीय चेहरा असंही बोललं जातं.
वसई विधानासभेतून स्वतः हितेंद्र ठाकूर, तर नालासोपारा विधानासभेतून त्यांचा मुलगा क्षितिज ठाकूर आमदार आहेत. बोईसर मतदारसंघातूनही हितेंद्र ठाकूर यांच्या बविआ पक्षाचे आम.विलास तरे हेच आमदार होते.मात्र मागील आठवड्यात त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून ठा कुरांना धक्का दिला.
शिवसेनेकडून विरोधी उमेदवारांना शह देण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. नालासोपारा विधानसभेत विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर यांना शह देण्यासाठी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा तर आ. हितेंद्र ठाकूर यांना टक्कर देण्यासाठी वसई विधानसभा मतदारसंघातून विजय पाटील किंवा श्रमजीवी संघटना व जनआंदोलन समितीचे संस्थापक अध्यक्ष माजी आम.व राज्यमंत्री विवेक भाऊ पंडित यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची जोरदार तयारी सुरू आहे.