Congress Harshwardhan Sapkal News: केंद्र सरकारकडून सुरु असलेल्या ED च्या गैरवापराविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. तसेच काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री स्व. डॉ. श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ज्ञवल्क्य जिचकार यांनी काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश केला. निवडणुकीच्या काळात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. ती मागे घेऊन त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. तर, आम आदमी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते धनंजय शिंदे यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दोघांचेही काँग्रेस परिवारात स्वागत केले.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत व प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या खासदारांची बैठक झाली. त्यानंतर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. संवाद, समन्वय रणनिती यावर या बैठकीत चर्चा झाली तसेच केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांवर सभागृहात व सभागृहाबाहेर आवाज उठवणे आणि जनतेचे मुद्दे उपस्थित करण्यावर सविस्तर चर्चा झाली, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. तसेच जनतेला फसवणाऱ्या महायुती सरकारविरोधात लढाई तीव्र करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
महाबळेश्वर येथे काँग्रेस पक्षाचे एक शिबीर आयोजित केले जाणार
प्रदेश व जिल्हा स्तरावरील कार्यकारिणीची पुनर्रचना लवकरच केली जाईल आणि महाबळेश्वर येथे काँग्रेस पक्षाचे एक शिबीर आयोजित केले जाणार आहे, अशी माहिती काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी दिली. तसेच राज्यातील युती सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. लाडकी बहिण योजनेतील लाभार्थींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन विसरले असून आता फक्त ५०० रुपयेच दिले जात आहेत. महायुतीने केवळ मतांसाठी योजना आणली होती. महायुती लाडक्या बहिणींची फसवणूक करत आहे, हे काँग्रेसने आधीच सांगितले होते, असे सांगत राज्य सरकारवर टीका करण्यात आली.
दरम्यान, केंद्र सरकारने सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईचा आम्ही निषेध करतो. जनतेत या कारवाईबद्दल तीव्र रोष आहे. काँग्रेस पक्षाने या दडपशाही विरोधात देशभर आंदोलन केले. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी आंदोलन करून भाजपा सरकारचा निषेध केला. मोदी शाह यांच्या सरकार विरोधात यापुढेही काँग्रेस पक्ष मजबूतीने लढा देईल, असा विश्वास रमेश चेन्नीथला यांनी दिला.