Join us  

पेट्रोल-डिझेलच्या बेसुमार दरवाढीविरोधात काँग्रेसची निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 9:42 PM

भाजप सरकारने सामान्य जनतेवर लादलेल्या पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस च्या दरवाढीविरोधात मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसतर्फे मुंबईतील २१ रेल्वे स्थानकांवर जोरदार निदर्शने करण्यात आली.

मुंबई -  भाजप सरकारने सामान्य जनतेवर लादलेल्या अन्यायकारक पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस च्या दरवाढीविरोधात मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसतर्फे मुंबईतील २१ रेल्वे स्थानकांवर जोरदार निदर्शने करण्यात आली. मुंबईमध्ये  मुंबई सीएसटी, सँडहर्स्ट रोड, मस्जिद बंदर, भायखळा, शिवडी, ग्रांट रोड, दादर पश्चिम, माहीम पश्चिम, सायन, वडाळा, चेंबूर, गोवंडी, घाटकोपर पूर्व, मुलुंड, बोरिवली, मालाड पश्चिम, गोरेगाव पश्चिम, अंधेरी पश्चिम, बांद्रा पूर्व, कुर्ला आणि साकीनाका मेट्रो स्टेशन या स्थानकांवर निदर्शने करण्यात आली आणि पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढलेल्या दरांचे माहितीपत्रक सुद्धा यावेळेस वाटप करण्यात आले. मुंबईच्या सर्व भागातील स्थानिक आजी माजी आमदार, नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते. 

या प्रसंगी बोलताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे सरकार येण्यापूर्वी महागाई संपवुन टाकण्याचा नारा दिला होता. पण आज भाजप सरकारमध्ये येऊन ४ वर्षे झाली तरीसुद्धा महागाई तसूभरही कमी झाली नाही. उलट वाढतच चालली. २०१२ मध्ये काँग्रेसचे सरकार असताना जे घरगुती गॅस सिलेंडर ३१९ रुपयांना मिळायचा, तो आजच्या घडीला, भाजप सरकारच्या राज्यात ७८४ रुपयांना मिळत आहे. २०१२ मध्ये मोदी म्हणत होते की, काँग्रेस सरकारने महागाई वाढवली आहे, आम्ही कमी करू. पण त्यांनी कमी न करता, उलट भरमसाठ वाढवली. आज भारतामध्ये सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल मुंबईमध्येच मिळते. मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत ८१ रुपये प्रति लिटर, तर डिझेल ची किंमत ६८ रुपये प्रति लिटर आहे. मी विचारतो की, मुंबईकरांनी असा कोणता गुन्हा केला आहे, ज्यामुळे त्यांना या महागाईच्या ओझ्याखाली भरडावे लागत आहे.  ज्या  मुंबईकरांनी शिवसेना भाजपला ६ खासदार, ३० आमदार दिले. मुंबई महापालिकेची सत्ता दिली. त्यांच्यावर हा अन्याय का? तुम्हाला निवडून दिले, हाच त्यांनी सर्वात मोठा गुन्हा केला आहे. असेच आता आम्हाला वाटत आहे. जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती कमी असताना सुद्धा भारतीयांना पेट्रोल आणि डिझेलसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. याला सर्वस्वी जबाबदार भाजप सरकार आहे. भाजप सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवर सर्वात जास्त टॅक्स लावला जातो. एक्साइज ड्यूटी, वॅट आणि सेस सर्वात जास्त असल्यामुळे मुंबईकरांना पेट्रोल व डीझेल महाग मिळत आहे. आमची अशी मागणी आहे की भाजपा सरकारने पेट्रोल आणि डीझेलला जीएसटीमध्ये समाविष्ट करावे. जर असे झाले तर मुंबईकरांना ८१ रुपये लिटर असलेले पेट्रोल ५२ रुपयांना आणि ६८ रुपये लिटर असलेले डिझेल ५४ रुपयांना मिळेल. पेट्रोल आणि डीझेल मुंबईकरांना अर्ध्या किंमतीत मिळतील. यामुळे मुंबईकरांना खूप मोठा दिलासा मिळेल, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले. 

संजय निरुपम पुढे म्हणाले की, डायमंड मर्चंट नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेला ११,५०० करोड रुपयांचा चुना लावून परदेशात फरार झाला. नीरव मोदीच्या या घोटाळ्याची माहिती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याना २०१६ मध्ये देण्यात आली होती. एवढेच नव्हे जानेवारी २०१८ मध्ये स्वित्झर्लंड मधील दोहा येथे झालेल्या इकॉनॉमिक समिट मध्ये हा नीरव मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर सहभागी होता. हा घोटाळा नरेंद्र मोदींच्या नाकाखाली झाला आहे. त्याला फरार करण्यामागे सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हात असण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. जर बँकेने दबाव सरकारवर दबाव टाकला नसता तर ही माहिती आजतागायत बाहेर आली नसती. नरेंद्र मोदी हे बोलतात मी पैसे खाणार नाही आणि कोणाला खाऊ देणार नाही पण हे खोटे आहे, ते तर आता पैसे खाणाऱ्यांना पळायला सुद्धा मदत करतात, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली. 

टॅग्स :संजय निरुपमकाँग्रेसमुंबई