Join us
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने मांडले भाजपचे टिपू सुलतान प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 10:29 IST

मुंबईच्या एम-पूर्व वॉर्डातील रस्त्याला शहीद टिपू सुलतान मार्ग नाव देण्याचा प्रस्ताव भाजप नगरसेवकाने मांडला. या प्रस्तावाच्या समर्थनासाठी विद्यमान आमदार अमित साटम यांच्यासह २१ नगरसेवक उपस्थित होते

मुंबई :  ‘भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत’ ही प्रतिज्ञा घेतलेल्या व विविधतेचे निदर्शक तिरंग्यातील तीन रंगांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने भाजप व संघाच्या विकृत विचारधारेचा निकराने विरोध केला पाहिजे, असे काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत म्हणाले. यावेळी त्यांनी विविध पुरावे सादर करत टिपू प्रकरणात भाजपवर दुटप्पीपणाचा आरोप केला. ऐतिहासिक व्यक्तिमत्वांची धर्माच्या आधारावर विभागणी करून द्वेष पसरविणे आणि ध्रुवीकरणाचे राजकारण करणे ही भाजपची विकृत पद्धती आहे, असेही सावंत म्हणाले.

मुंबईच्या एम-पूर्व वॉर्डातील रस्त्याला शहीद टिपू सुलतान मार्ग नाव देण्याचा प्रस्ताव भाजप नगरसेवकाने मांडला. या प्रस्तावाच्या समर्थनासाठी विद्यमान आमदार अमित साटम यांच्यासह २१ नगरसेवक उपस्थित होते. स्वत: साटम त्याचे अनुमोदक होते, असे सावंत यांनी प्रस्तावाचे कागदपत्र ट्विट करत दाखवून दिले. २०१७ला कर्नाटक विधानसभेत राष्ट्रपती रामदास कोविंद यांनी टिपूचा गौरवार्थ उल्लेख केला होता. त्यांना महान योद्धा संबोधून शहीद टीपू असे वर्णन केले होते. २०१२ साली अकोला महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहाचे नाव ‘शहीदे वतन शेरे म्हैसूर टीपू सुलतान’ असे करण्यात आले. या ठरावाचे सूचक माजी महापौर व सध्याचे भाजप अकोला महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल होेते.

इतिहासाला काळा-गोरा रंगवून टिपू सुलतानच्या नावाला भाजप विरोध करत आहे. परंतु, कोल्लूर येथील श्री मुकांबिका मंदिरातील पुजारी टिपूच्या सन्मानार्थ दररोज संध्याकाळी साडेसात वाजता ‘सलाम मंगलारती’ करतात. नंजनगुड येथील श्री कंठेश्वर मंदिरात टिपूने सादर केलेल्या पन्नाच्या लिंगाची पूजा सुरू आहे.

नेताजी बोस यांच्या होलोग्रामचे उद्घाटन मोदींनी केले, त्याच नेताजींनी टिपू सुलतानचा शहीद म्हणून उल्लेख केला. टिपूच्या म्हैसूर टायगरचा समावेश आझाद हिंद सेनेचा झेंडा तथा गणवेशावर केला होता. पेशव्यांच्या सेनेने इंग्रजांशी मिळून श्रींगेरी मठ उद्ध्वस्त केला. तेव्हा देवस्थानचे रक्षण व पुनर्स्थापना टिपू सुलतानने केली होती. म्हैसूर गॅझेटमध्ये टिपू सुलतानने मदत केलेल्या १५६ मंदिरांची यादी दिली आहे.

टॅग्स :काँग्रेसमुंबई