Join us  

काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का, सांगलीतील 11 नेत्यांचा भाजपात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2018 10:44 AM

11 जणांच्या भाजपा प्रवेशामुळं सांगलीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मोठं भगदाड पडले असल्याचे बोलले जात आहे. 

सांगली : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादीसह मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना व जनता दलाला मंगळवारी मोठा धक्का बसला. काँग्रेसचे माजी महापौर विवेक कांबळे, स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश आवटी यांच्यासह विद्यमान दोन नगरसेवक, दोन नगरसेविकांचे पती व पुत्रांसह २५ कार्यकर्त्यांनी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी या सर्वांचे भाजपमध्ये स्वागत केले. 

भाजप प्रवेश करणा-यात काँग्रेसचे माजी महापौर तथा रिपाइंचे प्रदेश सचिव विवेक कांबळे, स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश आवटी, नगरसेवक शिवाजी दुर्वे, नगरसेवक निरंजन आवटी, माजी नगरसेवक महादेव कुरणे, जनता दलाचे माजी नगरसेवक विठ्ठल खोत, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आनंदा देवमाने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संभाजी मेंढे, मनसेचे दिगंबर जाधव, संदीप आवटी, बाबासाहेब आळतेकर, दयानंद खोत, गणेश माळी, डॉ. पंकज म्हेत्रे, रमेश मेंढे, विनायक रुईकर, अभिजित कुरणे, महेंद्र पाटील, नितीन आवटी यांचा प्रामुख्याने समावेश आहे. 

सांगलीत महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. मतदारयाद्यांचा कार्यक्रम जाहीर झाला असून जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपने निवडणुकीची नोर्चेबांधणी सुरू केली आहे. मंगळवारी काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे व जनता दलाला भगदाड पाडत भाजपने २५ हून अधिक दिग्गज नेत्यांना प्रवेश दिला. मुंबईत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी या आजी-माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेश खाडे, आ. सुरेश हळवणकर, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मकरंद देशपांडे उपस्थित होते. 

यावेळी दानवे म्हणाले की, देशात व राज्यात भाजपची सत्ता आहे. राज्यातील अनेक महापालिका क्षेत्रातील जनतेने भाजपवर विश्वास व्यक्त करीत सत्ता सोपविली आहे. सांगलीच्या विकासासाठी शासनाने मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. महापालिका भाजपच्या ताब्यात आल्यास गेल्या १५ वर्षातील विकासकामांचा बॅकलॉग भरून काढू, असे आश्वासन दिले.  

पुत्र, पतींचाही समावेशकाँग्रेसचे नगरसेवक सुरेश आवटी व त्यांचे दोन्ही पुत्र नगरसेवक निरंजन व संदीप यांनी भाजपप्रवेश केला. जनता दलाच्या नगरसेविका संगीता खोत यांचे पती विठ्ठल खोत, मनसेच्या एकमेव नगरसेविका शांता जाधव यांचे पुत्र दिगंबर जाधव, माजी स्थायी समितीचे सभापती महादेव कुरणे, राष्ट्रवादीच्या नगरसेविका शुभांगी देवमाने यांचे पती आनंदा देवमाने यांचाही भाजपप्रवेश करणाºयात समावेश आहे.

टॅग्स :भाजपाकाँग्रेस