Congress Nasim Khan News:केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला त्याचे काँग्रेस पक्ष स्वागत करतो. काँग्रेस पक्ष व लोकसभेतील विरोध पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना करावी ही मागणी सातत्याने लावून धरली होती. काँग्रेसशासित राज्यात जातनिहाय जनगणना करण्यात आली आहे. पण भाजपाला याला विरोध होता. आता केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. पण जातनिहाय जनगणनेची निश्चित कालमर्यादा जाहीर करावी तसेच आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व CWC सदस्य नसीम खान यांनी केली आहे.
जातनिहाय जनगणना करण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. पुढील जनगणनेत ही प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात येईल, असे सरकारने म्हटले आहे. या विषयाचा विरोधकांनी राजकीय हत्यार म्हणून वापर केल्याबद्दल सरकारने टीका केली. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी अशा प्रकारच्या जनगणनेची मागणी केली होती. बिहार, तेलंगणा, कर्नाटकमध्ये जातनिहाय सर्वेक्षणही झाले. यानंतर आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान म्हणाले की, काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे काम केले व स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाने विकासाची पायाभरणी करून देशाला जगात एक मजबूत राष्ट्र म्हणून उभे केले. तसेच महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व काँग्रेस सरकार यांनी महाराष्ट्राला एक नंबरचे राज्य करण्यासाठी मोठे योगदान दिले, असे नसीम खान म्हणाले.