Join us  

“भाजप खोट्या भविष्यवाण्या करणारा पक्ष; महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकणार”

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 7:01 PM

भाजपला दररोज महाविकास आघाडीचे सरकार पडण्याचीच स्वप्ने पडतात, असा टोला लगावण्यात आलाय.

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे नेते दररोज नव्या भविष्यवाण्या करतात पण त्यांच्या भविष्यवाण्या सातत्याने खोट्या ठरत आहेत. नारायण राणे, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी अनेक खोट्या भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यांच्यावर आता कोणाचाही विश्वास राहिला नसून त्यांच्या भविष्यवाणीला काही अर्थ राहिलेला नाही, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी लगावला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यावर पत्रकारांनी  विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, भाजपाच्या भविष्यवाणीला काही अर्थ नाही, भाजपाचे नेते मागील दोन वर्षापासून मविआ सरकार पडणार अशा भविष्यवाण्या नेहमीच करत असतात पण त्यांचे भविष्य काही खरे ठरत नाही, असा टोला नाना पटोले यांनी यावेळी बोलताना लगावला. 

भाजपला दररोज सरकार पडण्याचीच स्वप्ने पडतात

महाविकास आघाडीला दोन वर्ष झाली तरी त्यांना अजूनही दररोज सरकार पडण्याचीच स्वप्ने पडत आहेत. मात्र, त्यांची भविष्यवाणी काही खरी ठरणार नाही. ‘मी पुन्हा येणार...मी पुन्हा येणार’ म्हणणारे थकून गेले असून, आता त्यांना वास्तवाची जाणीव झाली  आहे. आता नवीन कुडमुडे ज्योतिषी उदयास आले असून ते सरकार पडण्याची भविष्यवाणी करु लागले आहेत. त्याची ही भविष्यवाणीही खोटी ठरणार असून  महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालेल व महाराष्ट्राचा विकास करेल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, राज्याच्या राजकारण अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीला गेल्याचे पाहायला मिळाले. यानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी, लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजप सरकार सत्तेत येईल. तुम्हाला जो अपेक्षित बदल आहे तोदेखील दिसून येईल. मार्च महिन्यापर्यंत बदल दिसून येतील. जे काही आहे ते सर्व आता सांगता येणार नाही. सरकार पाडायचे असेल किंवा नवे सरकार स्थापन करायचे असेल तर गोष्टी या गुप्त ठेवाव्याच लागतात, असे भाकित राणे यांनी केले. यानंतर अनेक नेत्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करत भाजपवर टीका केली. 

टॅग्स :नाना पटोलेमहाविकास आघाडीभाजपा