भाई जगताप, काँग्रेस आमदार |
कोकणात कुटुंबातील मोठ्या मुलाला सर्वसाधारणपणे ‘भाई’ म्हणण्याची पद्धत आहे. त्यामुळे घरात मला भाई आणि माझ्या लहान भावाला भाऊ म्हणतात. तेच नाव माझी ओळख झाल्याने मी ते पुढे वापरू लागलो आणि रीतसर त्याचे गॅझेट करून घेतले. भाई म्हणजे मोठा भाऊ इतकाच अर्थ मी मानतो, मी कधीही ‘भाईगिरी’ या अर्थाने त्याकडे पाहिले नाही.
मी मुंबईत वाढलेला आणि शिकलेला असल्याने मुंबईच्या नाक्या नाक्यावर आणि गल्लोगल्ली खेळले जाणारे क्रिकेट माझ्याही रक्तात आहे. मला क्रिकेट खेळायला प्रचंड आवडते. मी टाइम शील्ड स्पर्धेपर्यंत क्रिकेट खेळलो. झुनझुनवाला महाविद्यालय आणि सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले. आमच्या महाविद्यालयाला रामनाथ पारकर, अशोक मंकड, विजय मांजरेकर यांसारख्या दिग्गज खेळाडूंची परंपरा आहे. आताही व्यग्र कार्यक्रमांमधून वेळ काढून माझ्या मढ आयलंडच्या घरात असलेल्या नेटमध्ये मी फलंदाजीचा सराव करतो. मी अजूनही चांगले क्रिकेट खेळतो असे माझे कुटुंबीय म्हणतात.
संप करणे मान्य नाहीराजकारणापेक्षा कामगार क्षेत्र मला जवळचे. मी कामगार नेता म्हणून सक्रिय झालो. आजही दीडशेपेक्षा अधिक कंपन्या आणि सुमारे साडेसहा लाख कर्मचारी, कामगार आमच्या संघटनेत आहेत. आयएसओ ९००१ मानांकन मिळालेली आमची एकमेव कामगार संघटना आहे. काही वर्षांपूर्वी विविध कंपन्या आणि गिरण्यांमध्ये झालेल्या संपामुळे उद्ध्वस्त झालेला कामगार पाहिल्यानंतर कधीही कंपनीत संप करायचा नाही, असे ठरवले. कारण कंपनी टिकली तरच कामगार टिकणार हे तत्त्व मानून आम्ही कामगारांना न्याय देण्याचे काम करतो.
मुलगी व्हावी हाच होता आग्रहमुंबईसारख्या महानगरात वाढताना माझी सामाजिक जाणीव प्रगल्भ होत गेली. मी महाविद्यालयात असतानाच ‘मुलगी वाचवा अभियान’ सुरू केले. माझ्या विवाहापूर्वीच मी या अभियानात स्वतःला झोकून दिले होते. त्यामुळे विवाहानंतर मी अट्टाहासाने मुलीच व्हाव्यात यासाठी आग्रही होतो. मला दोन मुली आहेत. माझी मोठी मुलगी मनाली ही फॅशन डिझायनर आहे. तिच्या क्षेत्रात ती उत्तम काम करते. आता मनालीचे वडील अशी माझी जेव्हा ओळख होते तेव्हा मला खूप आनंद होतो. माझी दुसरी मुलगी नमिता ही सौरऊर्जा क्षेत्रात अतिशय जिद्दीने काम करत आहे.
ग्रामीण युरोप आवडीचे ठिकाण दरवर्षी किमान पंधरा दिवस मी माझ्या कुटुंबाला पूर्ण वेळ देतो. मी कुटुंबाला घेऊन किमान दोन ते तीन देश फिरतो. त्यामुळे कुटुंबाला वेळ देता येतो याशिवाय परस्परांमधले बंध अधिक घट्ट होतात. मला जगभरात फिरायला आवडत असले तरी युरोपातील ग्रामीण भागात फिरायला जास्त आवडते.
शेकडो मुले घेतली दत्तकमाझी पत्नी तेजस्विनी ही सामाजिक कार्यात आघाडीवर आहे. कुठेही गाजावाजा न करता ती काम करते. तिने या क्षेत्रात काम करावे, असे मी कधीही सांगितले नाही मात्र ती स्वतःहून शिर्डी येथे वृद्धाश्रम चालवते. या वृद्धाश्रमात २१० पेक्षा अधिक आई-बाबांचे आम्ही संगोपन करतो. माझी मुलगी, पत्नी यांनी शोषित, वंचित, गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. आम्ही १८२ मुलांना दत्तक घेतले आहे. माझ्यासाठी ही राजकारणापेक्षा मोठी आनंदाची आणि आत्मिक समाधानाची बाब आहे. रायगडमधील काही मुले पायलट झाली आहेत, तर काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये रुजू झाली आहेत. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर अभिमान वाटतो.
व्यायाम हेच स्वास्थ्याचे गमक वय वाढले तरी मी तसाच दिसतो. वय चेहऱ्यावर दिसत नाही ही तुमची शुभेच्छा असं मी मानतो. मात्र यामागे माझ्या पत्नीची मेहनत आणि मी रोज सकाळी घरातच असलेल्या छोट्याशा व्यायामशाळेत करीत असलेला व्यायाम हे कारण आहे. मी दररोज ट्रेडमिलवर पाच किलोमीटर चालतो आणि काही वेळ व्यायाम, योग करतो.
शब्दांकन : सुरेश ठमके