Join us  

 ...म्हणून उद्धव ठाकरेंना नोबेल पुरस्कार द्यावा, काँग्रेसने केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 4:07 PM

धारावीमधील भाषणात उद्धव ठाकरेंनी धारावीतल्या लोकांना चावणारा डास हा मातोश्रीवर येऊन मलाही चावतो त्यामुळे धारावीकरांशी माझे रक्ताचे नाते आहे या विधानावर काँग्रेसने शिवसेनेशी खिल्ली उडवली आहे.

मुंबई -  दक्षिण मध्य मुंबईचे भाजपा- शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या धारावीमधील भाषणात उद्धव ठाकरेंनी धारावीतल्या लोकांना चावणारा डास हा मातोश्रीवर येऊन मलाही चावतो त्यामुळे धारावीकरांशी माझे रक्ताचे नाते आहे या विधानावर काँग्रेसने शिवसेनेशी खिल्ली उडवली आहे. मुंबईमधील वाढत्या डासांचा उपद्रव पाहता आम्ही मुंबई महापालिकेच्या कारभाराला दोष देत होतो. परंतु मुंबईकरांमध्ये भाऊबंदकी वाढावी, सद्भावना निर्माण व्हावी एवढ्या मोठ्या उदात्त हेतूने डासांची पैदावार वाढेल या हेतूने पाहिले जात होते असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शिवसेनेला लगावला आहे. 

तसेच उद्धव ठाकरेंमधील विचारवंत, तत्वज्ञ, शास्त्रज्ञ, आणि संवेदनशील व्यक्तिमत्व आम्ही इतकी वर्ष ओळखू शकलो नाही याबद्दल आम्हाला आता वैषम्य वाटत आहे. ‘डासभाऊ’ हा शोध लावणाऱ्या उद्धव ठाकरे यांची महानता जगाने ओळखली पाहिजे याकरता शांती व विज्ञान या दोन्ही क्षेत्रातील कामगिरीसंदर्भात विश्वडासबंधुत्व वाढवण्याकरीता जागतिक नोबेल पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस करावी अशी मागणी काँग्रेसने करत उद्धव ठाकरेंना चिमटा काढला आहे. 

यासंदर्भात बोलताना सचिन सावंत म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या या शोधामुळे वैज्ञानिक क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली आहे. डासांचा नायनाट करण्यासाठी या अगोदर कासवछाप अगरबत्ती सह विविध उत्पादने वापरुन डेंग्यू, मलेरियासारख्या रोगांना पायबंद कसा घालता येईल याकडे जनतेचा प्रयत्न असायचा परंतु डासांचा एवढा महान उपयोग असू शकतो हे कळल्यानंतर प्रेम, बंधुभाव आणि सद्भावना सारख्या महान उद्देशांसाठी आता या उत्पादनांवर बंदी घालायलाच हवी. एकच डास दोन व्यक्तींना चावल्याने त्यांच्यात बंधूभावाचे नाते तयार होते, असे उद्धव ठाकरेंनी आपल्याला सांगितले आहे. मात्र पती-पत्नी यांना चावल्यानंतर त्यांच्यात बंधूभाव निर्माण होऊ नये याकरता काही लस किंवा काही प्रतिबंधात्मक उपाय योजता येतील का याचाही शोध उद्धव ठाकरे व मुंबई महापालिकेनं घेतला पाहिजे असा खिल्ली काँग्रेसने शिवसेनेची उडवली आहे. 

धर्म व  जातीच्या नावाने राजकरण करुन समाजव्यवस्था बिघडवणाऱ्या व राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या भाजप शिवसेनेला हे कितपत पचनी पडेल यात शंका आहे, असं होऊ नये याकरता काही प्रतिबंधात्मक उपाय उद्धवजींनी योजले असतीलच, भविष्यात तेही उघड होईल असे उपरोधिक टोलाही सचिन सावंत यांनी लगावला आहे.  

टॅग्स :लोकसभा निवडणूकउद्धव ठाकरेशिवसेनाकाँग्रेसमुंबई दक्षिण मध्यमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019