Join us

“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 08:27 IST

Congress Harshwardhan Sapkal: मुंबई महानगरपालिकेत हजारो कोटी रुपयांच्या ठेवीबाबत सरकारने एक श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केली.

Congress Harshwardhan Sapkal: राज्यात अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. कावड यात्रा ही भारताला किंवा महाराष्ट्राला काही नवीन नाही पण वराह जयंती साजरा करावी अशी मागणी जर सत्ताधारी पक्षातील लोक करत असतील तर ते संतापजनक व निषेधार्ह आहे. त्यांचा अजेंडा स्पष्ट असून तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीचा हा त्यांचा अजेंडा आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

या सरकाला फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार एवढेच माहित आहे, त्यामुळे काल मोनोरेलची जी घटना घडली तसे प्रकार घडत आहेत. मुंबईची अवस्था बकाल करून ठेवली आहे. मुंबई महानगरपालिकेत हजारो कोटी रुपयांच्या ठेवी होत्या, त्या कुठे गेल्या, हा प्रश्न आहे. सरकारने यावर एक श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केली.

युवक काँग्रेसचे संघटन महाराष्ट्रभर उभे करा

काँग्रेस पक्षातून काही लोक गेले पण ही सुद्धा नवीन  नेतृत्वाला संधीच आहे. विधानसभेच्या २८८ जागा आहेत आण यावेळी काँग्रेसचे १६ आमदार निवडून आलेले आहेत. आता २७२ जागांवर नेतृत्व करण्याची संधी युवक काँग्रेसला आहे. लोकांच्या प्रश्नांवर संघर्ष करा. काँग्रेस विचार सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आहे तो विचार कानाकोपऱ्यात पोहचवत समाजाला अभिप्रेत असणारे संघटन उभे करा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीतही नवीन व तरुण चेहऱ्यांना जास्त संधी देण्यात आलेली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होत आहेत. कोणाला संधी मिळते मिळते नाही याची वाट न पाहता पक्षाचे काम करा. संघटनेत झोकून देऊन काम केले लोकांच्या प्रश्नांवर संघर्ष केला की संधी नक्की मिळते. विचार व कामाची कटिबद्धता कायम ठेवा. युवक काँग्रेसमध्ये काम केलेल्या अनेकांना काँग्रेस पक्षात महत्वाच्या पदावर काम करण्याची संधी मिळालेली आहे. संघटनेचे काम करा व भविष्यातील नेतृत्व तयार करा असे सपकाळ म्हणाले.

 

टॅग्स :काँग्रेसहर्षवर्धन सपकाळ