Join us  

विजय-सुदिनच्या संघर्षामुळे गोव्यात नेतृत्व बदलाबाबत जैसे थे स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 2:03 PM

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व करणे सोडले तर मंत्री विजय सरदेसाई व मंत्री सुदिन ढवळीकर या दोघांमधील संघर्ष अधिक तीव्र बनेल

सदगुरु पाटील

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व करणे सोडले तर मंत्री विजय सरदेसाई व मंत्री सुदिन ढवळीकर या दोघांमधील संघर्ष अधिक तीव्र बनेल व परिणामी सरकारच पडू शकते याची कल्पना भाजपाच्या दिल्लीतील नेत्यांना आली आहे. त्यामुळे नेतृत्व बदल न करता जैसे थे स्थिती ठेवावी, असे ठरले असल्याची माहिती भाजपाच्या उच्च स्तरावरून गुरुवारी मिळाली.

विद्यमान सरकार हे फक्त दोन घटक पक्षांच्या आधारामुळे उभे आहे. या दोन घटक पक्षांचे नेते एकमेकांशी संघर्ष करत असताना व शह-काटशहचे राजकारण खेळत असताना गोव्यात जर नेतृत्व बदल केला तर जास्त दिवस सरकार चालू शकणार नाही याची कल्पना भाजपाच्या केंद्रीय निरीक्षकांच्या अहवालावरून व गोव्याच्या तिन्ही खासदारांशी केलेल्या चर्चेवरून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना आली आहे. 

येत्या शनिवारी किंवा रविवारी शहा हे दिल्लीतील एम्स इस्पितळात जाऊन मुख्यमंत्री पर्रीकर यांना भेटणार आहेत. पर्रीकर  यांनी आपल्या आजारामुळे नेतृत्व पद सोडण्याची इच्छा शहा यांच्याकडेच सर्वप्रथम व्यक्त केली होती. पर्रीकर यांची ही इच्छा जाहीर होताच, सत्ताधारी आघाडीचा घटक पक्ष असलेल्या मगो पक्षाचे मंत्री ढवळीकर यांच्याकडे नेतृत्वाचा तात्पुरता ताबा द्यावा असे भाजपामध्ये ठरले होते. गोवा फॉरवर्डचे मंत्री विजय सरदेसाई यांना याची कल्पना येताच त्यांनी ढवळीकर यांना शह देण्याच्या हेतूने एकूण सहा आमदारांना एकत्र केले. आम्हाला तात्पुरत्या ताबा देण्यासारखे तात्पुरते उपाय नको तर कायमस्वरुपी तोडगा हवा, अशी भूमिका मंत्री सरदेसाई यांच्या नेतृत्वाखालील एकूण सहा आमदारांनी घेतली. यामुळे भाजपाची व पर्रीकर  यांचीही गोची झाली. त्यामुळेच गेल्या शनिवारी शहा यांनी स्वत: मंत्री सरदेसाई यांना गोव्यात फोन केला व भाजपाचे निरीक्षक आपण तातडीने पाठवून देतो, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा, सरकार स्थिर राहिल एवढे पाहा असे सरदेसाई यांना सांगितले. 

शहा यांनी गोव्यात जे निरीक्षक पाठविले होते, त्यांनी आपला अहवाल बुधवारी शहा यांना दिला. शहा यांनी भाजपाच्या गोव्यातील तिन्ही खासदारांशीही चर्चा केली. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, विनय तेंडुलकर व नरेंद्र सावईकर यांचे मत शहा यांनी जाणून घेतले. पर्रीकरांच्या अनुपस्थितीत मंत्री सरदेसाई व मंत्री ढवळीकर या दोन्ही नेत्यांमध्ये चाललेले एकमेकांचे पत्ते कापण्याचे राजकारण शहा यांना कळाले. त्यामुळे गोव्यातील नेतृत्व तूर्त पर्रीकर  यांच्याकडेच ठेवावे व मंत्र्यांना अतिरिक्त खाती देऊन किंवा सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद वगैरे निर्माण करून स्थिती नियंत्रणाखाली ठेवावी असे ठरले आहे. शहा हे शनिवार किंवा रविवारी याविषयी पर्रीकर यांच्याशी अंतिम चर्चा करतील व मग निर्णय जाहीर होईल, असे पक्ष सुत्रांनी सांगितले.

चाळीस सदस्यीय गोवा विधानसभेत मंत्री सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्ड पक्षाकडे तीन व मंत्री ढवळीकर यांच्या मगो पक्षाकडे तीन आमदार आहेत पण सरकारला पाठींबा दिलेले तीन अपक्ष आमदार हे मंत्री सरदेसाई यांच्याकडे असल्याने सरदेसाई यांचे पारडे जड ठरते याकडे शहा यांनी दुर्लक्ष केलेले नाही पण उपमुख्यमंत्रीपद जर निर्माण केलेच तर ते कुणाला दिले जाईल हा प्रश्न अनुत्तरीत आहे. उपमुख्यमंत्र्यांमार्फत सरकार चालवायचे पण नावापुरते पर्रीकर यांना मुख्यमंत्रीपद ठेवावे असा फॉम्यरुला तयार झाला आहे. मात्र उपमुख्यमंत्रीपद कुणाकडे द्यावे ते ठरेल तेव्हा नव्या वादास तोंड फुटू शकते.

टॅग्स :गोवाराजकारणभाजपाअमित शाह