बरे हाेण्यासाठी औषधांपेक्षा आत्मविश्वास जास्त काम करतो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 03:01 AM2021-05-04T03:01:39+5:302021-05-04T03:01:56+5:30

जामसूतकर कुटुंब झाले काेराेनामुक्त; सकारात्मक विचार करणे गरजेचे

Confidence works better than medicine for healing | बरे हाेण्यासाठी औषधांपेक्षा आत्मविश्वास जास्त काम करतो

बरे हाेण्यासाठी औषधांपेक्षा आत्मविश्वास जास्त काम करतो

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना बरा होतो. फक्त हवा तो आत्मविश्वास. हवी ती सकारात्मकता. आम्ही ज्या रुग्णालयात दाखल होतो त्या रुग्णालयातील आया, नर्स, वॉर्ड बाय अपु-या सेवा सुविधांवर कोरोना रुग्णांचे प्राण वाचवित होते. त्यांना जगण्याचे बळ देत होते. पॉझिटिव्हीटी देत होते. त्यांच्याकडे पाहून, त्यांनी दिलेल्या जगण्याच्या प्रेरणेमुळेच आम्ही कोरोनासारख्या आजारातून बरे झालो; अशी प्रतिक्रिया जामसूतकर कुटुंबाने दिली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे औषधांपैक्षा आत्मविश्वास जास्त काम करतो. त्यामुळे तुम्ही आत्मविश्वास गमावू नका, असेदेखील जामसूतकर कुटूंबाकडून सांगण्यात आले.

राजेश जामसूतकर यांनी सांगितले की, आम्ही देवनार म्युन्सिपल कॉलनमध्ये विमल कॉ.आॅपरेटिव्ह सोसायटी येथे वास्तव्यास आहोत. मी एका खासगी कंपनीत ऑफिस सुपर वायझर म्हणून नोकरीस आहे. माझ्या संपुर्ण कुटूंबात माझे बाबा पांडुरंग जामसूतकर, आई वनिता  जामसूतकर, मी राजेश जामसूतकर, पत्नी नेहा जामसूतकर आणि मुलगी मैथिली जामसूतकर यांना कोरोनाची लागण झाली होती. मी सुरुवातीला कस्तुरबामध्ये दाखल झालो. मला श्वसनाचा जास्त त्रास होऊ लागला. मग मी एका खासगी रुग्णालयात दाखल झालो. माझी पत्नी आणि मुलगी मसिना रुग्णालयात दाखल होती. आई-बाबांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अशा काळात अनेक अडचणी, आर्थिक समस्या असतात. मानसिक ताण असतो. मात्र कोरोनाला हरवायचे असेल तर सकारात्मक विचार  खूप गरजेचे आहेत. मी बरा होणार, माझ्या घरी परत जाणार, असा विचार केल्यास आपण सहज बरे होतो. हा आत्मविश्वास आपल्यात हवा. आत्मविश्वास औषधांपेक्षा जास्त काम करतो. आमच्याकडे तो होता, असे राजेश जामसूतकर यांनी सांगितले.

जीवावर उदार होत काम
कस्तुरबा रुग्णालयात आया, नर्स साधा मास्क परिधान करून रुग्णांची सेवा करत होत्या. कोविड सेंटरसाठी पीपीई किट होते. मात्र त्या बाहेर जे लोक होते त्यांना काहीच सेवा नव्हत्या. कोणत्याही सेवा नसताना स्वत:च्या जीवावर उदार होत हे लोक जर आपल्यासाठी एवढे काम करत आहेत तर आपण देखील यातून बाहेर पडले पाहिजे, असे आम्हास वाटल्याचे कुटूंबाने सांगितले.
मेहनतीला बळ

नर्स आणि वॉर्ड बाय यांच्याकडे सेवा सुविधा नसतानादेखील ते रुग्णांना दिलासा देत होते. मोटिव्हेट करत होते. आपण बरे होणार, असे म्हणत दिलासा देत होते. यांच्या मेहनतीला बळ देण्यासाठी आपण बरे होणे गरजेचे आहे, असे कुटूंबास वाटले.

५० टक्के निधी द्या
नगरसेवक, आमदार आणि खासदार यांचा ५० टक्के निधी हा कोरोनावरील उपचारासाठी खर्च केला पाहिजे. सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींचा निधी कोरोनावरील उपचारासाठी वापरला पाहिजे. चौक, फुटपाथ, नाले अशा कामांसाठी निधी वापरण्यापेक्षा हा निधी आता कोरोनावरील उपचारासाठी वळविला पाहिजे. 

आराेग्य सेवा बळकट हवी
का रुग्णांना आरोग्य सेवा देताना आपली तारांबळ उडाली आहे. याचा अर्थ आरोग्य सेवेला प्राधान्य दिले पाहिजे. आपण आपली आरोग्य सेवा बळकट केली पाहिजे.

छक्के-पंजे नकोत
प्रशासकीय अधिका-यांना जाण पाहिजे. मात्र अधिकारी छक्के-पंजे खेळतात. त्यांनी असे करता कामा नये. आरोग्य सेवेला प्राधान्य द्या. मग माणसे मरणार नाहीत.

 

Web Title: Confidence works better than medicine for healing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.