निवडणुका 'बॅलेट पेपर' ने घ्या; अन्यथा आंदोलन - आनंदराज आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 19:37 IST2024-01-05T19:35:57+5:302024-01-05T19:37:48+5:30
सत्ताधारी पक्षाकडून संसदीय निवडणुकीच्या नावे ईव्हीएम मशीनचा माध्यमातून मतांचा घोटाळा करीत निवडणुका जिंकल्या जात आहेत.

निवडणुका 'बॅलेट पेपर' ने घ्या; अन्यथा आंदोलन - आनंदराज आंबेडकर
श्रीकांत जाधव
मुंबई: सत्ताधारी पक्षाकडून संसदीय निवडणुकीच्या नावे ईव्हीएम मशीनचा माध्यमातून मतांचा घोटाळा करीत निवडणुका जिंकल्या जात आहेत. त्यामुळे ईव्हीएम मशीनचा आम्ही तीव्र विरोध करीत असून पुढील सर्व प्रकारच्या निवडणुका 'बॅलेट पेपर' वर घ्यावेत. अन्यथा संविधान बचाव यात्रेच्या माध्यमातून राज्यभर जनजागृती केली जाईल असा इशारा रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी येथे केली. लोकसभेच्या दोन जागा रिपब्लिकन सेना लढविणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
'रिपब्लिकन सेनेची पुढील वाटचाल आणि आगामी निवडणुकातील भूमिका' याबाबत सरसेनानी आनंदराज आंबेडकर, राज्य अध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात माध्यमांशी संवाद साधला. छुप्या मार्गाने आरक्षण संपवले जात आहे. शिक्षण क्षेत्रात गोंधळ माजला आहे. कंत्राटी पद्धतीने सरकारी नोकर भरती संपवली जात आहे. शासकीय यंत्रणेची हेडसाळ सुरु आहे. औरंगजेबाप्रमाणे नागरिकांकडून कर वसुली सुरू आहे. अंगणवाडी सेविकांना फसवी आश्वासने दिली जात आहेत त्यामुळे सगळीकडे अनास्था असल्याचेही आनंदराज म्हणाले.
लोकशाहीचा चुकीचा अर्थ सांगत संसदीय निवडणुकीत मतदारांच्या हक्कांशी देशातील सत्ताधारी पक्ष विश्वासघात करीत आहेत. यासाठी ईव्हीएम मशीनचा माध्यम म्हणून जाणून उपयोग केला जात आहे. ईव्हीएमने मतांचा घोटाळा करून सत्ताधारी निवडणुका जिंकत आहेत. वारंवार सिद्ध होऊनही ईव्हीएम मशीन वापरले जाते. त्याचा आम्ही तीव्र विरोध करीत असून पुढील सर्व प्रकारच्या निवडणुका 'बॅलेट पेपर' वर घ्यावेत. अन्यथा संविधान बचाव यात्रेच्या माध्यमातून राज्यभर मतदारांमध्ये जनजागृती करून रान उभे केले जाईल, असा इशारा ही सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.
रिपब्लिक सेना २ जागा लढविणार
राज्यात सध्या सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. ग्रामीण भागात जनतेचे हाल सुरू आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकात लोकसभेच्या अमरावती आणि लातूर या दोन जागा रिपब्लिकन सेना लढविणार असल्याची घोषणा सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी केली.