मुंबई: आयआयटी मुंबईतील सांस्कृतिक महोत्सव असलेल्या मूड इंडिगो या फेस्टिव्हलमध्ये प्रयोजक असलेल्या एका कंपनीकडून कंडोमची जाहिरात केली जाणार होती. त्यासाठी कंडोम कंपनीकडून कॅम्पसमध्ये बॅनर आणण्यात आले होते. तसेच, समाजमाध्यमातून जाहिरातबाजी सुरू करण्यात आली होती.
विद्यार्थ्यांच्या टीकेला यावरून सामोरे जावे लागल्यानंतर आयआयटी प्रशासनाने ही जाहिरात काढून टाकण्याचे निर्देश कंपनीला दिले होते. त्यानंतर कंपनीने जाहिराती मागे घेतल्या आहेत.
आयआयटी, मुंबईत २५ ते २७ डिसेंबरदरम्यान मूड इंडिगो महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवासाठी एका कंपनीला प्रायोजकत्व देण्यात आले आहे. त्या कंपनीकडून विविध वस्तूंचे उत्पादन घेतले जाते. त्यामध्ये या कंडोमचाही समावेश होता. कंपनीकडून सोमवारी रात्री कंडोमच्या जाहिराती करणाऱ्या स्टँडी कॅम्पसमध्ये आणण्यात आल्या होत्या. तसेच, समाजमाध्यमातूनही आयआयटी मुंबईच्या महोत्सवाचे नाव घेऊन जाहिरात सुरू केली होती. याबाबत विद्यार्थ्यांनी आयआयटी प्रशासनाकडे ई-मेलद्वारे तक्रार केली होती. तसेच, या जाहिराती थांबविण्याची मागणी केली होती. त्यानंतर आयआयटी प्रशासनाने कंपनीला कंडोमच्या जाहिराती काढण्याचे निर्देश दिले आहेत.
कंपनी फेस्टिव्हलची प्रायोजक नाही
याबाबत कंडोम तयार करणारी कंपनी मूड इंडिगो फेस्टिव्हलची प्रायोजक नसल्याचे आयआयटी-मुंबई प्रशासनाने स्पष्ट केले आहे. धोरणाचा भाग म्हणून कॅम्पसमध्ये जाहिराती लावण्यापूर्वी त्यांची पडताळणी प्रशासनाकडून केली जाते.
मात्र, या महोत्सवाच्या व्हेंडरने या कंपनीचे नाव, तसेच उत्पादनांची माहिती प्रशासनाला दिली नव्हती. विद्यार्थ्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर तत्काळ यावर कारवाई करून या जाहिराती कॅम्पसमध्ये प्रदर्शित करण्यापूर्वीच माघारी पाठविण्यात आल्या आहेत, अशी माहिती आयआयटी- मुंबई प्रशासनाने दिली.