Join us

पावसाचे पाणी काँक्रीटचे रस्ते शोषून घेणार! रस्ते बांधणीत पोरस काँक्रीटचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 06:58 IST

मुंबईकरांनो, नक्की काय आहे तंत्रज्ञान, जाणून घ्या सविस्तर...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई:  मुंबईकरांना दर्जेदार आणि खड्डेमुक्त रस्ते मिळावेत यासाठी पालिका शहरात ३९७ किमी काँक्रीटचे रस्ते बांधत असून पालिकेने सुमारे सहा हजार कोटींच्या निविदा मागवल्या आहेत. या कामात आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाणार असून, पाणी शोषून घेणाऱ्या ‘पोरस’ काँक्रीटचा उपयोग केला जाणार आहे. यामुळे अतिवृष्टीत मुंबईच्या रस्त्यांवर तुंबणाऱ्या पाण्यापासून मुंबईकरांची सुटका होणार आहे.

मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत सुमारे २ हजार किमीचे रस्ते आहेत. हे सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे बनवण्याचे धोरण पालिकेने आखले आहे. यामधील सुमारे १ हजार किमी रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण पूर्णही झाले आहे. शिल्लक रस्ते टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रीटचे बनवण्यात येत आहेत.

यामध्ये ३९७ किमी रस्त्यांसाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत. हे काम ४ महिन्यांचा   पावसाळ्याचा कालावधी सोडून वेळेत पूर्ण करून घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचा अनुभव असलेल्या, तसेच दर्जेदार रस्ता बांधणाऱ्या कंत्राटदाराकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत.

काय आहे तंत्रज्ञान?

  • पोरस तंत्रज्ञानामध्ये वापरले जाणारे काँक्रीट पाणी शोषून निचरा करणारे असेल. या काँक्रीटमधील छिद्रांमधून पाण्याचा निचरा वेगाने होईल. 
  • फुटपाथमध्येही हे तंत्रज्ञान वापरता येईल. हे पाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या वाहिन्यांमधून ‘यू’ आकाराच्या गटारामधून जलवाहिन्या, ठराविक अंतरावरील छोट्या विहिरींमध्ये निचऱ्यासाठी पाठवता येईल. 
  • जेणेकरून अतिवृष्टी सुरू असताना रस्त्यावर पाणी तुंबणार नाही.
टॅग्स :मुंबईपाऊस