Join us

प्रदूषणमुक्त मुंबईसाठी बजेटमध्ये हवी ठोस तरतूद; मुंबईकरांच्या महानगरपालिकेला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 14:56 IST

खड्डेमुक्त रस्त्यांचाही प्रशासनाकडे आग्रह

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई महापालिकेच्या २०२५-२६ सालच्या प्रस्तावित अर्थसंकल्पात जनतेचा वाढता सहभाग असावा यासाठी प्रशासनाने नागरिकांकडून मागवलेल्या सूचना येण्यास आता सुरुवात झाली आहे. यामध्ये मुंबईतील प्रदूषणाची भयावह स्थिती लक्षात घेता हवामान कृती योजनेच्या अंमलबजावणीसाठी आराखडा निश्चित करावा, वनीकरण आणि हरित कवच वाढवावे, हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी उपाय योजावेत, या सूचनांबरोबरच खड्डेमुक्त रस्ते असावेत, यावरही भर देण्यात आला आहे.

रस्ते बांधकामाची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी पुरेशी अर्थसंकल्पीय तरतूद करणे आवश्यक आहे. विशेषत: पावसाळ्यात रस्ते खड्डेमुक्त राहावेत यासाठी तज्ज्ञांना नियुक्त करायला हवे. सेवा वाहिन्या आणि तत्सम कामांसाठी रस्ते वारंवार खोदले जाऊ नयेत म्हणून रस्त्याच्या कडेला त्यासाठी स्वतंत्र डक्ट बांधले जावेत, अशा सूचनाही खड्डेमुक्त मुंबईच्या दृष्टीने करण्यात आल्या आहेत.

किनारपट्टी भागात संरक्षण प्रणाली

अतिवृष्टीच्या वेळी पूर आणि किनारपट्टीवरील धोक्यांचा सामना करण्यासाठी ड्रेनेज सिस्टमचे जाळे आणखी बळकट करावे, समुद्राच्या पृष्ठभागावरील वाढत्या तापमानामुळे चक्रीवादळासह किनारपट्टीवरील संभाव्य धोके पाहता टेट्रा पॉड्स आणि इतर किनारपट्टी संरक्षण प्रणालीसाठी तरतूद वाढवावी, मुंबईतील प्रमुख प्रदूषक असलेल्या घटकांची पातळी कमी करण्यासाठी हवेच्या गुणवत्तेची देखरेख यंत्रणा मजबूत करावी, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.

हवामान कृती योजनेला प्राधान्य देणे गरजेचे

  • पालिकेने शून्य हरितगृह वायू उत्सर्जनासाठी मार्च २०२२ मध्ये मुंबई हवामान कृती योजना प्रकाशित केली होती. आगामी अर्थसंकल्पात त्याला प्राधान्य दिले पाहिजे. 
  • मुंबईत १९७३ पासून प्रत्येक दशकात ०.२५ अंश सेल्सिअसने वाढ नोंदवण्यात आली आहे. तापमानवाढीचा हा कल लक्षात घेता वनस्पतींचे आच्छादन वाढवून घनदाट वसाहतींमध्ये उष्णतेचे धोके कमी करण्याच्या दृष्टीने निधी उपलब्ध करून द्यावा. 
  • या पार्श्वभूमीवर अधिकाधिक झाडे लावणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आगामी अर्थसंकल्पात विचार केला जाईल, अशी अपेक्षाही मुंबईकरांनी व्यक्त केली आहे.
टॅग्स :मुंबईअर्थसंकल्प 2024मुंबई महानगरपालिकाप्रदूषण