मुंबई विमानतळावर संगणकीय प्रणाली हँग; विमान सेवांवर परिणाम, विलंबामुळे प्रवाशांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 06:13 IST2025-08-10T06:13:38+5:302025-08-10T06:13:55+5:30
तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे काही विमान कंपन्यांनी प्रवाशांना हस्तलिखित चेक-इन पास जारी केले.

मुंबई विमानतळावर संगणकीय प्रणाली हँग; विमान सेवांवर परिणाम, विलंबामुळे प्रवाशांचे हाल
मुंबई : मुंबईविमानतळावरील संगणकीय प्रणाली दुपारी ३:००च्या सुमारास हँग झाल्याचा मोठा फटका उड्डाण करणाऱ्या विमानांना बसला. परिणामी, अनेक विमानांना उड्डाण करण्यासाठी विलंब झाला. सुमारे पाऊण तासाने तांत्रिक समस्या दूर करण्यात यश आले. मात्र, सेवा सुरळीत होण्यास तीन तासांपेक्षा जास्त कालावधी लागला. तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे काही विमान कंपन्यांनी प्रवाशांना हस्तलिखित चेक-इन पास जारी केले. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले.
देशातील दुसऱ्या क्रमांकाचा बिझी विमानतळ असलेल्या मुंबई विमानतळावरून दिवसाकाठी ९५०पेक्षा जास्त विमानफेऱ्या होतात आणि दिवसाला लाखो प्रवासी ये-जा करतात. या तांत्रिक बिघाडानंतर एअर इंडियाने प्रवाशांच्या सुविधेसाठी तातडीने एक निवेदन जारी केले. या निवेदनानुसार, मुंबई विमानतळावरील नेटवर्क व्यवस्थापन करणाऱ्या त्रयस्थ कंपनीमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याचा फटका बसल्याचे नमूद करण्यात आले. यामुळे प्रवासाला विलंब होऊ शकतो. प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या विमानाची नियोजित वेळ आणि त्यातील बदल तपासावेत, असे आवाहनही कंपनीने केले होते.