रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पाचे काम दोन वर्षांत पूर्ण करा : मुख्यमंत्र्यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 09:21 IST2025-10-15T09:18:22+5:302025-10-15T09:21:52+5:30
झोपडपट्ट्यांतील रहिवाशांचे सुयोग्य पुनवर्सन करणार; शाळा, खेळाचे मैदान, व्यायामशाळा, आरोग्य केंद्र सेवांची ग्वाही

रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पाचे काम दोन वर्षांत पूर्ण करा : मुख्यमंत्र्यांचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माता रमाबाई आंबेडकर आणि कामराजनगर नगर पुनर्विकास प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करणार आहोत. एमएमआरडीए आणि एसआरएने प्रकल्पबाधितांना दोन वर्षांचे आगाऊ भाडे दिले आहे; तर तिसऱ्या वर्षाच्या भाड्याची व्यवस्था करून ठेवली आहे. मात्र तिसऱ्या वर्षाचे भाडे लोकांना देण्याची गरज पडू नये. आता एमएमआरडीए आणि एसआरए यांनी दोन वर्षांतच हे बांधकाम पूर्ण करावे, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
माता रमाबाई आंबेडकरनगर आणि कामराजनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री पंकज भोयर उपस्थित होते.
पुढील दोन वर्षांत आधुनिक, सुसज्ज इमारती उभ्या राहतील. या उद्घाटनावेळी पुन्हा उपस्थित राहू, असेही फडणवीस म्हणाले.
समूह पुनर्विकास धोरणास शासनाची मंजुरी
मुंबईसाठी मोठ्या प्रमाणात समूह पुनर्विकास धोरणास शासनाने मंजुरी दिली आहे. याद्वारे झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांना फक्त घरच नाही, तर खेळाचे मैदान, जिम, शाळा, आरोग्यकेंद्र अशा सर्व सोयीसुविधा देऊन त्यांचे सुयोग्य पुनर्वसन केले जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
माता रमाबाई आंबेडकरांचे स्मारक उभारणार
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासोबतच आता त्यांच्या सहचारिणी माता रमाबाई आंबेडकर यांचे स्मारकही उभारले जाणार आहे.
रमाबाई नगरातील क्लस्टर पुनर्विकास योजनेतून हे स्मारक उभारले जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
१७ हजार कुटुंबांचे आयुष्य उजळून निघेल
गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून येथील लोक कठीण परिस्थितीत जगत आहेत. आज त्यांचा खडतर प्रवास संपला आहे. पुढील तीन-चार वर्षांत या प्रकल्पात १७ हजार कुटुंबांचे आयुष्य उजळून निघेल. दिवाळी पुढच्या आठवड्यात असली तरी या रहिवाशांची खरी दिवाळी आजच साजरी झाली आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.
रमाबाईनगर आणि कामराजनगर हा परिसर म्हणजे केवळ झोपडपट्टीचा समूह नाही, तर ही जागा संघर्ष, आत्मसन्मान आणि जिद्दीची साक्षीदार आहे. हा परिसर महाराष्ट्रातील सामाजिक जागृतीचा, परिवर्तनाचा आणि चळवळींचा एक सशक्त केंद्रबिंदू राहिला आहे.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री