Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो-३च्या तेरा स्थानकांचे भुयारीकरण पूर्ण; कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गिकेच्या भुयारीकरणाला वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 03:30 IST

८७ टक्के काम पूर्ण झाल्याची एमएमआरसीएलची माहिती

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-मार्गिकेच्या भुयारीकरणाच्या कामाला वेग आला आहे. या संपूर्ण मार्गिकेसाठी सुरू असलेल्या भुयारीकरणापैकी आत्तापर्यंत ८७ टक्के भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गिकेवरील २६ मेट्रो स्थानकांपैकी तेरा स्थानकांचे भुयारीकरणाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित तेरा मेट्रो स्थानकांचे भुयारीकरण येत्या तीन ते चार महिन्यांमध्ये पूर्ण होईल, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे (एमएमआरसीएल) देण्यात आली.

मेट्रो मार्गिकेसाठी ५५ कि.मी.चे भुयारीकरण करण्यात येणार आहे. मेट्रो-३ मार्गिकेने सहा व्यावसायिक केंद्रे, पाच उपनगरीय रेल्वे स्थानके, स्थानिक व आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि लोकलने न जोडलेले परिसर जोडले जाणार आहेत. खोदकाम पूर्ण झालेल्या स्थानकांमध्ये कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसएमटी, सायन्स म्युझियम, सिद्धिविनायक, एमआयडीसी, मरोळ नाका, सहार रोड, सीएसएमआयए-आंतरदेशीय, सीएसएमआयए - आंतरराष्ट्रीय विमानतळ व सीप्झ या स्थानकांचा समावेश आहे.

संचालक (प्रकल्प) एस.के.गुप्ता म्हणाले की, सध्या सुरू असलेल्या स्थानकांच्या कामाला आणखी गती प्राप्त होईल. उर्वरित स्थानकांचे खोदकामदेखील युद्ध पातळीवर सुरू आहे आणि येत्या तीन ते चार महिन्यांत ते पूर्ण होईल. एकंदरीत ८७ टक्के भुयारीकरण पूर्ण झाले आहे, असेही ते यावेळी म्हणाले. उर्वरित स्थानकांमध्ये काळबादेवी स्थानकाचे २६ टक्के, गिरगाव स्थानक १४ टक्के, ग्रँट रोड स्थानक ५६ टक्के, मुंबई सेंट्रल स्थानक ७३ टक्के, महालक्ष्मी स्थानक ७५ टक्के, आचार्य अत्रे चौक स्थानक ३९ टक्के, वरळी स्थानक ८२ टक्के, दादर स्थानक ८८ टक्के, शितलादेवी स्थानक ७१ टक्के, धारावी स्थानक ८१ टक्के, बीकेसी स्थानक ८३ टक्के, विद्यानागरी स्थानक ८७ टक्के, सांताक्रुझ स्थानक ९३ टक्के अशा तेरा स्थानकांचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे.पहिली मेट्रो डिसेंबरमध्ये येणारमेट्रो-३ मार्गिकेसाठी पहिली मेट्रो डिसेंबर, २०२० मध्ये मुंबईमध्ये दाखल होणार आहे. यासह काळबादेवी गिरगाव येथील प्रकल्पग्रस्तांचे ते राहत असलेल्या ठिकाणीच पुनर्वसन होणार असून, के-३ या पहिल्या पुनर्विकास इमारतीच्या बांधकामाचे कंत्राट जानेवारीमध्येच देण्यात येणार आहे, तर जी-३ इमारतीच्या बांधकामाचे कंत्राट मे, २०२० मध्ये देण्यात येणार आहे. मेट्रो-३ मार्गिकेचे संचलन आणि देखभाल कामाच्या निविदा फेब्रुवारीमध्ये मागविण्यात येतील, तर जायकाच्या कर्जाचा तिसरा टप्पा मार्चपर्यंत येणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे, या वर्षी मार्गासाठी रूळ टाकण्याचे काम सुरू होणे अपेक्षित आहे. यासह विविध प्रणालींच्या कामात आरेखन काम पूर्ण होऊन उपकंत्राटदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

टॅग्स :मेट्रो