म्हाडाच्या लोकशाही दिनावर तक्रारदारांच्या गोंधळाचे सावट; म्हाडा प्राधिकरणातील अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 15:43 IST2024-12-30T15:43:34+5:302024-12-30T15:43:52+5:30

...असा गोंधळ होत असेल तर लोकशाही दिन आयोजित करण्यात काय अर्थ? असा सवाल आता म्हाडा अधिकाऱ्यांकडून उपस्थित होत आहे. त्यामुळे लोकशाही दिनावरच सावट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Complainants' confusion on MHADA's Lokshahi Din; Discontent among MHADA authority officials | म्हाडाच्या लोकशाही दिनावर तक्रारदारांच्या गोंधळाचे सावट; म्हाडा प्राधिकरणातील अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

म्हाडाच्या लोकशाही दिनावर तक्रारदारांच्या गोंधळाचे सावट; म्हाडा प्राधिकरणातील अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

मुंबई : म्हाडाशी निगडीत समस्या सोडविण्यासाठी प्राधिकरणाकडून आतापर्यंत सात लोकशाही दिन आयोजित करण्यात आले आहेत.  मात्र, एवढे करूनही गेल्या काही दिवसांपासून म्हाडा मुख्यालयात येऊन गोंधळ घालणाऱ्या तक्रारदारांची संख्या वाढली आहे. असा गोंधळ होत असेल तर लोकशाही दिन आयोजित करण्यात काय अर्थ? असा सवाल आता म्हाडा अधिकाऱ्यांकडून उपस्थित होत आहे. त्यामुळे लोकशाही दिनावरच सावट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

म्हाडाशी निगडीत अनेक समस्यांचा किंवा अडचणींचा डोंगर सातत्याने वाढत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये घरांच्या लॉटरीपासून पुनर्विकासाच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी लोकशाही दिनाची संकल्पना मांडली. या माध्यमातून तक्रारदारांच्या समस्या सोडविण्यासाठी उपाध्यक्षांपासून प्रत्येक अधिकाऱ्याने प्रयत्न केले आहेत. यामध्ये पुनर्विकासाच्या प्रश्नापासून संक्रमण शिबिर आणि घराचे प्रश्न सोडविण्यासाठी यात प्रयत्न करण्यात आले.

एखादा प्रश्न सुटत नसेल तर स्वतः उपाध्यक्षांनी त्या प्रश्नात लक्ष घालून अधिकाऱ्यांना हा प्रश्न सोडवण्यासाठी पर्याय सुचवावेत, असेदेखील सांगण्यात आले. लोकशाही दिनामध्ये एखादी तक्रार सुटली नाही, तरी समोरचा तक्रारदार निराश होणार नाही, यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावे, अशा सूचना प्रत्येक वेळा देण्यात आल्या आहेत. तसेच संबंधित विषयाचा प्रश्न वेळेत निकाली काढण्यासाठी काम केले जात आहे. मात्र, असे असूनही गेल्या काही वर्षांमध्ये म्हाडा मुख्यालयात दाखल होत गोंधळ घालणाऱ्या किंवा अधिकाऱ्यांशी नीट संवाद साधला जात नसल्याच्या घटना समोर येत आहेत.

कर्मचाऱ्यांचे आज लेखणी बंद आंदोलन
-  म्हाडामधील अधिकारी या घटनांमुळे व्यथित होत असून, या पद्धतीने नागरिक वागत असतील तर मग लोकशाही दिन का आयोजित करायचे? असा सवाल आता उपस्थित होत आहे. 
-  दरम्यान, या प्रकरणाच्या निषेधार्थ कर्मचारी युनियनने सोमवारी लेखणी बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र काम बंद ठेवून आपण नागरिकांची गैरसोय होता कामा नये, यासाठी हे आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन त्यांना करण्यात आले आहे, अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली.
-  नुकत्याच झालेल्या घटनेमुळे मुख्यालयात या विषयाची चर्चा रंगली असून, उपाध्यक्षांच्या दालनाबाहेरच गोंधळ झाल्याने तक्रारदारांच्या मनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

लोकाभिमुख कारभार
नागरिकांच्या समस्यांचे तत्परतेने निवारण करूनदेखील काही उपद्रवी लोकांकडून कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांसाठी अशा प्रकारे अरेरावीची भाषा वापरून अपशब्द वापरले जात असल्याने अधिकाऱ्यांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. 
अशा प्रकारच्या घटनांमुळे या अधिकाऱ्यांचे मनोबल खचले आहे. नागरिकांनी समस्या, तक्रारी मांडताना संयम ठेवत, शांतपणे, मुद्देसूद मांडणी करावी, अशी अपेक्षा म्हाडातील अधिकारी - कर्मचारी व्यक्त करत आहेत. नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणे लोकसेवकांचे कर्तव्य आहे. 
मात्र, समस्या  मांडतेवेळी संबंधित अधिकाऱ्यांना अपशब्द वापरणे, अरेरावीची भाषा करणे, धमक्या देणे आदी बाबी चुकीच्या आहेत, असे म्हाडातील अधिकारी कर्मचारी यांचे म्हणणे आहे.

Web Title: Complainants' confusion on MHADA's Lokshahi Din; Discontent among MHADA authority officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा