धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी तीन विकासकांमध्ये स्पर्धा; अदानी ग्रुप, नमन ग्रुप अन् डी.एल.एफ ग्रुप
By सचिन लुंगसे | Updated: November 16, 2022 16:47 IST2022-11-16T16:47:05+5:302022-11-16T16:47:05+5:30
धारावी पुनर्विकास प्रकल्प ६०० एकरवर होणार आहे. २३ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी तीन विकासकांमध्ये स्पर्धा; अदानी ग्रुप, नमन ग्रुप अन् डी.एल.एफ ग्रुप
मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी एकूण तीन विकासकांनी निविदा दाखल केल्या असून यात अदानी ग्रुप, नमन ग्रुप आणि डी एल एफ ग्रुप यांचा समावेश आहे. आता या तीन विकासाकांच्या निविदांचा अभ्यास केला जाणार असून, आढावा घेत त्यानंतर आर्थिक निविदा खुल्या केल्या जातील, अशी माहिती धारावी पुनर्विकास विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली.
धारावी पुनर्विकास प्रकल्प ६०० एकरवर होणार आहे. २३ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. आता या तिन्ही कंपन्या प्रकल्पांच्या अटी आणि शर्ती मध्ये बसतात का ? याची तपासणी केली जाईल. अभ्यास केला जाईल. आढावा घेतला जाईल. दरम्यान, २००४ मध्ये धारावी झोपडपट्टीचा चेहरा बदलण्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात आला. प्रकल्पाच्या बांधकामासाठी २००९ मध्ये पहिल्यांदा जागतिक स्तरावर निविदा मागविण्यात आल्या. मात्र निविदेला प्रतिसाद मिळाला नाही.
२०११ मध्ये निविदा रद्द करण्यात आली. त्यानंतर २०१६ मध्ये सेक्टर १, २, ३ आणि ४ साठी दुसऱ्यांदा निविदा मागविण्यात आल्या. या निविदेला पाच वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर पुन्हा एकदा निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्यानंतर आता तीन विकासकांनी या प्रकल्पासाठी निविदा दाखल केल्या आहेत.