Join us
Daily Top 2Weekly Top 5

४०४ अपघात प्रकरणांत ३६ कोटींची भरपाई; मुंबईतील लोकअदालतमध्ये अपघातग्रस्तांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 13:07 IST

या लोकअदालतीत एका मोटार अपघात प्रकरणात तब्बल १ कोटी २० लाख इतक्या भरपाईची तडजोड करण्यात आली, जी या सत्रातील सर्वाधिक सेटलमेंट ठरली...

मुंबई : मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत मुंबई येथील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणात मोठ्या प्रमाणावर मोटार अपघात भरपाईच्या प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा करण्यात आला. या लोकअदालतीत एका मोटार अपघात प्रकरणात तब्बल १ कोटी २० लाख इतक्या भरपाईची तडजोड करण्यात आली, जी या सत्रातील सर्वाधिक सेटलमेंट ठरली.

या लोकअदालतीत एकूण ४०४ प्रकरणे यशस्वीरित्या निकाली काढण्यात आली असून, त्यामध्ये तब्बल ३६ कोटी ४७ लाख २९ हजार ३४१ इतक्या रकमेची तडजोडीने भरपाई निश्चित करण्यात आली. त्यामुळे अनेक अपघातग्रस्त व त्यांच्या कुटुंबीयांना दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रकरणांतून मोठा दिलासा मिळाला. लोकअदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी एकूण ७ पॅनेल गठित करण्यात आले होते. या पॅनेलसमोर एकूण ६६९ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी अनेक प्रकरणांमध्ये सामोपचाराने तडजोड घडवून आणण्यात आली आणि ४०४ प्रकरणांचा अंतिम निपटारा करण्यात आला.

सामोपचाराने निपटारा आणि त्वरित न्यायही लोकअदालत  मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाच्या अध्यक्षा एम. आय. आरलँड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. 

एमएसीटी बार असोसिएशनचे अध्यक्ष, सदस्य तसेच न्यायालयीन कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे लोकअदालतीचे कामकाज सुरळीत आणि यशस्वीरीत्या पार पडले. 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या पुढाकारामुळे राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून प्रलंबित प्रकरणांचा जलद व सामोपचाराने निपटारा होऊन पक्षकारांना त्वरित न्याय मिळण्यास मोठी मदत होत असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले.

 

टॅग्स :लोकअदालतमुंबईअपघात