Join us  

सड्डी दिल्ली की आमची मुंबई? कोणतं शहर आहे सरस?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2017 4:19 PM

मुंबई की दिल्ली श्रेष्ठ याबाबत कायम चर्चा केल्या जातात, मात्र त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. दोन्हीं शहरांची तुलना मात्र कायम होत असते.

ठळक मुद्देतसं म्हणायला गेलं तर दिल्ली हे एक राज्य आहे, तर मुंबई हे एक शहर. शिक्षणासाठी, नोकरीसाठी देशभरातून लोक या दोन्ही ठिकाणी स्थायिक होत असतात. तरीही आपला मुलूख हेच आपलं जग असतं आणि तेच सर्वश्रेष्ठ असतं. त्यामुळे मुंबईकरांना आपली मुंबईच भारी वाटते तर दिल्लीकर दिल्लीलाच जास्त महत्व देतात. तरीही आपला मुलूख हेच आपलं जग असतं आणि तेच सर्वश्रेष्ठ असतं. त्यामुळे मुंबईकरांना आपली मुंबईच भारी वाटते.

मुंबई : देशाची राजकीय राजधानी दिल्ली आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई. सगळ्यात चांगलं शहर कोणतं यावरून नेहमीच वाद उफाळून येत असतात. अर्थात हे वाद लाडीक असतात. पण तरीही मुंबईकरांना वाटतं की मुंबई श्रेष्ठ आणि दिल्लीकरांना वाटतं की दिल्ली श्रेष्ठ. दोन्हीही शहरं भारतात महत्त्वाची आहेत. दोन्हीही शहरात औद्योगिकीकरण झालंय. दोन्ही शहरं स्मार्ट आहेत. दोन्ही शहरं वेगवेगळी असल्याने संस्कृतीही वेगवेगळी आहे. दिल्लीतला इंडिया गेट जितका प्रसिद्ध आहे तितकाच मुंबईतील गेट ऑफ इंडिया. तसंच दिल्ली ज्याप्रमाणे प्रदुषणाच्या विळख्यात अडकली आहे त्याचप्रमाणे थोड्याफार प्रमाणात मुंबईतही प्रदुषण आहेच की. पण तरीही सगळ्यात भारी शहर कोणतं हा प्रश्न उरतोच.

सगळ्यात पहिला मुद्दा आपण प्रदुषणाचा घेऊ. कारण दिल्लीतलं प्रदुषण सध्या चांगलंच चर्चेत आहे. गेल्या काही वर्षात दोन्ही शहरात प्रदुषण वाढलंय. मुंबईत तर हिवाळ्यातही पाऊस पडतोय, आणि तिकडे दिल्लीत धुळीचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे प्रदुषणाच्या बाबतीत दिल्लीपेक्षा मुंबई भारी आहे असं म्हणालयला हरकत नाही.आता जाऊया आपण थेट वाहतूक कोंडीकडे. मुंबई ही दिल्लीपेक्षा थोडीशी लहान आहे. दिल्लीपेक्षा मुंबईची लोकसंख्या जास्त आहे. आता कमी जागेत जास्त लोक राहायला लागली की गर्दी ही होणारच. त्यात गाड्यांचीही भर आलीच. त्यामुळे दिल्लीपेक्षा मुंबईत जास्त ट्रॅफिक असतं यात काहीच दुमत नाही. 

कोणत्याही शहरात गेल्यावर तिकडे शॉपिंग करणं हे भागच आहे. त्यामुळे दिल्लीत कमी पैशात शॉपिंग करता येती की मुंबईत हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. मुंबईत ज्याप्रमाणे फॅशन स्ट्रीट, लिंकींग रोड, मोठे मॉल्स, शॉप आहे त्याचप्रमाणे दिल्लीतही दिल्ली हट, जनपथ, सरोजिनी नगर अशा ठिकाणी तुम्ही मनसोक्त शॉपिंग करू शकता. दिल्लीला फॅशन ऑफ कॅपिटल असंही म्हटलं जातं. त्यामुळे तुम्हाला दिल्लीत अनेक व्हरायटीज मिळतीलही. पण दिल्लीपेक्षा मुंबईत शॉपिंग करणं जरा परवडेबल आहे असं काहीजण म्हणतात. सुरक्षिततेच्या बाबतीत मुंबई अव्वल आहे. दिल्लीत पर्यटक म्हणून गेलेल्या कित्येक तरुणी त्यांच्या पर्यटनातील सुरक्षततेविषयी कहाण्या सांगतात. त्याचप्रमाणे तुम्हालाही दिल्लीतल्या अनेक घटना ऐकू येतच असतील. म्हणून सुरक्षेच्या बाबतही मुंबई भारीच आहे.

आता आपण थोडंसं वाहतूक व्यवस्थेकडे जाऊया. मोनो, मेट्रो आणि लोकल या तीनही वाहतूक व्यवस्था दोन्ही शहरात आहेत. दिल्लीत मेट्रो मुंबईच्या आधी सुरू झाली. दिल्लीतल्या सगळ्याच ट्रेन (मोनो, मेट्रो, रेल्वे) वेळेवर येतात त्यामानाने मुंबईतल्या लोकल वेळापत्रकाविषयी तुम्हाला नव्याने सांगायला नको. पण मुंबईतलं तिकिट हे दिल्लीतल्या तिकिटापेक्षा कितीतरी पटीने स्वस्त आहे. दिल्लीत मेट्रो आणि रेल्वेचं तिकिट मुंबईपेक्षा महाग आहे. त्यामुळे इकडे मुंबईत प्रवास करणं दिल्लीत प्रवास करण्यापेक्षा स्वस्त आहे.

मुंबईत घरं महाग आहेत. मुंबईत भाड्याने राहायचं असलं तरीही सामान्यांच्या खिशाला कात्री लागते. पण मुंबईत आजही कित्येक ठिकाणी 4 ते 5 हजार मासिक भाडे तत्वावर लोक राहतात. दिल्लीत मुंबईपेक्षा घरं स्वस्त आहेत. पण तरीही मुंबईत आपलं एक घर असावं असं प्रत्येकालाच वाटतं. म्हणून तर मुंबईला सिटी ऑफ ड्रिम्स म्हणतात. आता स्वप्न साकार करायची म्हणजे थोडीसा खिसा हा रिकामा करावाच लागणार ना.दिल्लीकरांच्या राहणीमानाचा अभ्यास केला तर ते जरा उच्च घरणातील लोकांप्रमाणे राहतात. त्यामानाने मुंबईत सगळ्याच वर्गातील लोक राहात असल्याने मुंबईकरांचं राहणीमान तोलता येणार नाही. मुंबईत गरीब, श्रीमंत, मध्यम वर्गीय अशी सगळीच लोकवस्ती आढळत असल्याने मुंबईतलं राहणीमान नक्की कसं आहे हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे मुंबई सगळ्यांनाच आपलीशी वाटते. 

तरुणांच्या गळ्यातला ताईत असलेली गोष्ट म्हणजे नाईट लाईफ. नाईट लाईफच्या बाबतीतही मुंबईच अव्वल आहे. अनेक पब, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स रात्रभर चालू असतात. त्यासाठी अनेक पर्यायही आपल्याकडे आहेत. त्यामानाने दिल्लीतलं नाईट लाईफ तितकसं आकर्षक नसल्याचं काहीजण सांगतात.

आता आपण येऊया खवय्यांकडे. मुंबईत किती खाऊगल्ल्या आहेत हे आपण याआधी पाहिलंच आहे. तसंच मुंबईत सगळ्याच जाती-धर्माची माणसं राहतात. त्यामुळे प्रत्येक संस्कृतीतील खाद्यपदार्थ तुम्हाला चाखायला मिळतील. मुंबईतल्या प्रत्येक हॉटेलमध्ये प्रत्येक प्रांतातील मेजवानी चाखायला मिळेल. एवढंच कशाला, मुंबईतली पाणी पुरी, वडापावची मजा पराठ्यांना नाही येणार. दिल्लीतही अनेक स्ट्रीट फूड स्टॉल्स आहेत, मोठे रेस्टॉरंट्स आहेत. पण मुंबईतल्या पदार्थांची मजा तिकडे येणं शक्यच नाही. 

आता पर्यटन स्थळांच्या बाबतीत विचार केला तर दिल्लीत अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. तसंच डोंगररांगाही तिकडे आहेत. निसर्गाचं एक अजब वरदान दिल्लीला लाभलंय. पण आपली मुंबईही काही कमी नाही. समुद्राच्या कुशीत वसलेल्या या मुंबईतही अनेक पर्यटन स्थळं आहेत. चौपाट्या, उद्यानं, कपल्स पॉईंट यामुळे मुंबईतही अनेक पर्यटक येत असतात. त्यामुळे पर्यटनाच्या बाबतीत नेमकं कोणतं शहर चांगलं हे कोणताच पर्यटक सांगू शकणार नाही. 

मुंबईची मुळ भाषा तुम्हाला माहितेय? हिंदी मराठी यांचं मिश्रण म्हणजे मुंबईकरांची भाषा. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ही भाषा फार प्रसिद्ध आहे. परगावाहून आलेल्यांना आपल्यात सामावून घेण्यासाठी मुंबईकर इतरांचीही भाषा शिकतो. त्यातून एक वेगळीच भाषा इथं तयार होते. दिल्लीत मात्र हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांच्या जीवावर राहावं लागतं. 

तसं म्हणायला गेलं तर दिल्ली हे एक राज्य आहे, तर मुंबई हे एक शहर. पण तरीही दोन्ही ठिकाणांनी अनेकांना आपल्यात सामावून घेतलंय. शिक्षणासाठी, नोकरीसाठी देशभरातून लोक या दोन्ही ठिकाणी स्थायिक होत असतात. आता नव्या ठिकाणी आपलं घरदार सोडून जाऊन राहायचं म्हणजे थोडसं अवघडच काम आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी थोडीशी अ‍ॅडजस्टमेंट ही करावीच लागते. त्यामुळे नक्की कोणतं शहर श्रेष्ठ हे सांगता येत नाही. पण तरीही आपला मुलूख हेच आपलं जग असतं आणि तेच सर्वश्रेष्ठ असतं. त्यामुळे मुंबईकरांना आपली मुंबईच भारी वाटते तर दिल्लीकर दिल्लीलाच जास्त महत्व देतात. 

आणखी वाचा - एका दिवसाच्या मुंबई सफरीत ही ठिकाणं विसरु नका.

टॅग्स :दिल्ली गेटमुंबईमेट्रोभारत