लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : काळाचौकीत सूत धागे खरेदी करून ते विदेशात निर्यात करणाऱ्या कंपनीत सहायक व्यवस्थापक निर्यात पदावर काम करत असलेल्या कर्मचाऱ्याने चार दलालांच्या मदतीने खोटे व्यवहार दाखवून कंपनीला ६९ लाख ८३ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. काळाचाैकी पोलिसांनी याप्रकरणी विनोद राठोडविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कंपनीचा कॉटनग्रीन परिसरात सूत धागे खरेदी करून ते निर्यात करण्याचा व्यवसाय आहे. जालना जिल्ह्यातील मूळ रहिवासी आणि कांदिवलीत वास्तव्यास असलेल्या राठोड याने एप्रिल २०२२ मध्ये कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला. कंपनीने त्याला सहायक व्यवस्थापक निर्यात पदावर नोकरीला ठेवले. त्याने त्याच्या ओळखीचे काही जण विदेशात कामाला असून त्यांच्याकडून कंपनीला माल खरेदीच्या ऑर्डर मिळू शकतात.
त्या बदल्यात त्यांना काही रक्कम कमिशन म्हणून द्यावी लागेल असे सांगितले. पुढे, ओळखीचे चार दलाल कंपनीसाठी ‘ट्रेड एजंट’ म्हणून कंपनीचा व्यापार वाढवण्यास मदत करतील असेही सांगितले. पुढे, त्याने भरपूर ऑर्डर मिळत असल्याचे भासवून राठोड याने चार एजंटच्या माध्यमातून ६९ लाख ८३ हजार उकळले. राठोडने अचानक जून २०२३ मध्ये नोकरी सोडली. त्यानंतर कंपनीच्या तपासणीत फसवणूक उघडकीस आली.