लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहातील मूलभूत सोयी-सुविधांची पाहणी करण्यासाठी राज्य सरकारने आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ९ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती विद्यापीठातील कलिना कॅम्पस् येथील येथील न्यू गर्ल्स हॉस्टेल आणि नरिमन पॉइंट येथील मादाम कामा हॉस्टेलमधील मूलभूत सोयी-सुविधांची पाहणी करून दोन महिन्यांत अहवाल सादर करणार आहेत. पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेत मुलींच्या वसतिगृहातील असुविधांचा मुद्दा चर्चेला आल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
नरिमन पॉइंट येथील मादाम कामा हॉस्टेलमध्ये असुविधांबाबत आमदार मिलिंद नार्वेकर यांनी पावसाळी अधिवेशनात अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता. तसेच या वसतिगृहात पूर्णवेळ वॉर्डन नाही, खानावळ बंद असल्याने विद्यार्थिनींच्या जेवणाची गैरसोय झाली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. चर्चेदरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वसतिगृहाची पाहणी करण्यासाठी समिती नेमण्याचे आश्वासन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ही समिती गठित केली आहे.
वसतिगृहात मूलभूत सुविधा नसल्याच्या बाबीवरून राज्य सरकारला समिती नेमावी लागते हे दुर्दैवी आहे, अशी टीका विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य शीतल शेठ-देवरुखकर यांनी केली. विद्यापीठाचे मादाम कामा वसतिगृह हे विद्यापीठाच्या कॅम्पसबाहेर आहे. वसतिगृहात पूर्णवेळ वॉर्डन नाही. या वसतिगृहात विद्यापीठाने पूर्णवेळ वॉर्डन नेमावा, अशी मागणी युवासेनेचे नेते आणि सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केले.
समितीत कोण असेल?
समितीच्या अध्यक्षपदी आमदार प्रवीण दरेकर असतील. तर समितीत आमदार अविनाश जाधव, विनायक डांगे, मनीषा कायंदे, विलास नाईक, सुभाष प्रभू, मुंगेश कडाळकर, शेखर निकम हे सदस्य असतील. तर उच्च शिक्षण विभागाचे विभागीय सहसंचालक हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत.