मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे कॉरिडॉरवरील ३९ उपनगरीय रेल्वे स्थानके आणि ३४ मेट्रो स्थानकांच्या मल्टी मोडल इंटिग्रेशन (एमएमआय) योजनेसाठी नियोजन सुरू आहे. यासाठी विशेष समिती स्थापन झाली असून, उपनगरीय व मेट्रो स्थानकांतील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. या महिन्यात समितीची बैठक होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि एमएमआर क्षेत्रातील १५ मेट्रो कॉरिडॉरमध्ये असलेली ३४ मेट्रो स्थानके निवडण्यात आली आहेत, जी उपनगरीय रेल्वेशी जोडली जातील. रेल्वे आणि एमएमआरडीएच्या प्राथमिक मूल्यांकनानुसार, ३९ उपनगरीय स्थानके मेट्रो, मोनोरेल आणि बीकेसी प्रस्तावित पॉड टॅक्सीशी एकत्रित होतील. पॉड टॅक्सी कुर्ला (पश्चिम) ते वांद्रे (पूर्व) रेल्वे स्थानकांना जोडेल, तर संत गाडगे महाराज चौक मोनोरेल स्थानक महालक्ष्मी रेल्वे स्थानकाशी जोडले जाईल. प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक उपनगरीय स्थानकांवर मोठे एलिव्हेटेड डेक बांधण्याचे काम सुरू असून, भविष्यात हेच डेक मेट्रो स्थानकांशी थेट जोडले जाणार आहेत. त्यामुळे पूर्वनियोजन आवश्यक असल्याने समितीमार्फत याबाबत कार्यवाही होईल.
एमएमआरडीएकडे प्रतिनिधित्व
एमएमआयसाठीच्या समितीत मध्य व पश्चिम रेल्वे, एमआरव्हीसी, एमएमआरडीए, सिडको, महामेट्रो तसेच मेट्रो मार्गिका उभारणाऱ्या संस्थांचा समावेश असेल.
समन्वय आणि प्रतिनिधित्वाची जबाबदारी एमएमआरडीएकडे असणार आहे.
मध्य रेल्वे मुख्यालय (सीएसएमटी) येथे होणाऱ्या बैठकीत विद्यमान कनेक्टिव्हिटी, त्यातील त्रुटी, इंटरचेंज सुविधा असलेल्या स्थानकांवरील गर्दी, तसेच स्थानकाबाहेरील परिस्थितीचा आढावा घेतला जाईल.
एमएमआयअंतर्गत होणाऱ्या सुविधा
मेट्रो आणि लोकल स्टेशनची थेट जोडणी
स्थानकाबाहेरील पदपथांचे रुंदीकरण
बस, ऑटो, कार आणि राइड-शेअरिंग सेवांसाठी पार्किंग बे
पादचारी क्रॉसिंग, मार्गदर्शक चिन्हे आणि जंक्शन सुधारणा