मुंबई शहरात व्यावसायिक ग्राहकांकडे सिलिंडरची ‘बँक’ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 10:04 IST2025-10-07T10:04:30+5:302025-10-07T10:04:44+5:30
अनधिकृत साठा आढळल्यास कारवाई : गॅस कंपन्यांकडून जनजागृती

मुंबई शहरात व्यावसायिक ग्राहकांकडे सिलिंडरची ‘बँक’ !
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत ७८ हजार व्यावसायिक गॅस ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणावर सिलिंडरचा साठा आहे. त्यामुळे गॅसच्या सुरक्षित वापरासंदर्भात ३५० शिबिरे घेऊन जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी दिली आहे. दरम्यान, अनधिकृत गॅस सिलिंडरविरोधात कारवाईचे सूतोवाचही पालिका आणि गॅस कंपन्यांनी दिले.
गेल्या काही दिवसांत स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमुळे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, पालिका भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांच्या सहकार्याने पुढील १० विशेष जनजागृती अभियान राबविणार आहे. या अभियानाच्या अनुषंगाने भायखळा येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयात सोमवारी बैठक झाली. त्यावेळी आंबुलगेकर बोलत होते. ‘भारत पेट्रोलियम’चे क्षेत्रीय व्यवस्थापक संदीप पवार, हिंदुस्तान पेट्रोलियमच्या वरिष्ठ व्यवस्थापिका गीतिका पालीवाल याप्रसंगी उपस्थित होते.
३५० ठिकाणी शिबिरे
स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर वापराबाबत व सुरक्षिततेबाबत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. जनजागृती अभियानांतर्गत मुंबईतील ३५० पेक्षा अधिक ठिकाणी गॅस सिलिंडर वापराबाबत प्रात्यक्षिकांसह प्रबोधन व जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बहुसंख्य घरगुती गॅस ग्राहकांकडे दोन सिलिंडर आहेत.
बहुतांश व्यावसायिक ग्राहकांकडे एकापेक्षा अधिक सिलिंडर आहेत.
अनेक व्यावसायिक ग्राहकांकडे ‘सिलिंडरची बँक’ ही आहे.
एकूण २५ लाख ७८ हजार ग्राहक असले तरी अनेकांकडे एकूण सिलिंडरची संख्याही त्यापेक्षा निश्चितच जास्त आहे.
दोन्ही गॅस कंपन्यांनी मुंबईत ७ ते १७ ऑक्टोबरदरम्यान राबवल्या जाणाऱ्या अभियानाव्यतिरिक्त, त्यानंतरदेखील ग्राहकांच्या मागणीनुसार सोसायटी स्तरावर, वसाहत स्तरावर जनजागृती शिबिरे नियमितपणे आयोजित करावीत.
- रवींद्र अंबुलगेकर, प्रमुख अग्निशमन अधिकारी