Join us

केसांवर गाण्यातून टिप्पणी करणे म्हणजे लैंगिक छळ नाही - उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 12:18 IST

बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला दिलासा...

मुंबई : कामाच्या ठिकाणी महिला सहकाऱ्याच्या केशसंभारावर गाणे म्हणणे म्हणजे काही लैंगिक छळ नाही, असा स्पष्ट निर्वाळा देत उच्च न्यायालयाने एचडीएफसी बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला दिलासा दिला. 

पुण्यात एचडीएफसी बँकेत सहयोगी क्षेत्रीय व्यवस्थापकदावर कार्यरत असलेल्या विनोद कचवे यांच्याविरोधात त्यांच्या महिला सहकाऱ्याने बँकेच्या अंतर्गत तक्रार समितीकडे तक्रार दाखल केली. समितीने दाखल केलेल्या अहवालाच्या आधारावर औद्योगिक न्यायालयाने जुलै, २०२४ मध्ये कचवे यांना कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण - पॉश) नियम, २०१३ अंतर्गत दोषी ठरवले. कचवे यांची पदावनती करण्यात आली. त्यांनी औद्योगिक न्यायालयाच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावरील सुनावणी न्या. संदीप मारणे यांच्या पीठापुढे झाली. याचिकाकर्त्याने तक्रारदाराच्या घनदाट आणि लांब केसांबाबत टिप्पणी केली आहे. तसेच केशसंभारासंबंधी गाणे गायले आहे. तक्रारदाराचा लैंगिक छळ करण्याच्या उद्देशाने ही टिप्पणी केली गेली होती, असे मानणे कठीण आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. जेव्हा ही टिप्पणी केली गेली तेव्हा त्यांनी स्वतः कधीही ती टिप्पणी लैंगिक छळ म्हणून समजली नाही, असेही न्यायालयाने म्हटले. अन्य एका तक्रारीबाबतही न्यायालयाने लैंगिक छळाचा मुद्दा फेटाळून लावला. कचवे यांचा एक सहकारी फोनवर गप्पा मारत होता. त्यावेळी त्यांनी गर्लफ्रेण्डशी गप्पा मारत आहे का, अशी विचारणा केली. त्यावर कचवे यांनी केलेली टिप्पणी आक्षेपार्ह होती आणि त्यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटले. ती टिप्पणी एकप्रकारे लैंगिक छळ आहे, असा दावा तक्रारदाराने केला. मात्र, न्यायालयाने तो दावा फेटाळला.

नेमके प्रकरण काय?याचिकाकर्त्यांनुसार, ११ जून २०२२ रोजी प्रशिक्षण सत्रात, तक्रारदार केस वारंवार नीट करत होत्या. त्यामुळे याचिकादाराने मस्करी करीत विचारले की, तुम्ही तुमचे केस सांभाळण्यासाठी जेसीबी वापरत असाल. तक्रारदाराला अस्वस्थ वाटू नये, यासाठी आपण हलक्या आवाजात ये रेश्मी झुल्फे, गाण्याच्या ओळी गायल्या. त्यानंतर याचिकाकर्ता आणि तक्रारदार यांच्यातील व्हॉट्सॲप संभाषणावरून असे लक्षात येते की, याचिकाकर्ता प्रत्यक्षात तक्रारदाराला तिच्या कामगिरीबद्दल प्रेरित करत होते आणि तक्रारदाराने त्याबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली, असे न्यायालयाने म्हणाले.

टॅग्स :विनयभंगबँकन्यायालयलैंगिक छळ