Join us

एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेनंतर कुणाल कामराने उचललं मोठं पाऊल; हायकोर्टात घेतली धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 12:45 IST

अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Kunal Kamra Controversy: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाण्यातून टीका करणारा स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे महाराष्ट्र सरकार कुणाल कामरावर कठोर कारवाई करण्याची तयारी करत आहे. दुसरीकडे या सगळ्या प्रकरणात कुणाल कामराने मोठं पाऊल उचललं आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिप्पणीवरून कॉमेडियन कुणाल कामरा याने मद्रास उच्च न्यायालयात ट्रान्झिट अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर कुणाल कामराने हायकोर्टाचे दार ठोठावलं आहे.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाण्यातून टीका केल्यानंतर शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांनी कुणाल कामराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कामराविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्याला दोनदा समन्स बजावले होते. मात्र कामराने पोलिसांसमोर चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी वेळ मागितला होता. पोलिसांनी कामराची मागणी फेटाळून लावल्यानंतर त्याने मद्रास हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे.  

कुणाल कामरा हा तामिळनाडूतील विल्लुपुरम शहरातील रहिवासी आहे. त्यामुळे त्याने अटकपूर्व जामिनासाठी मद्रास हायकोर्टात धाव घेतली. शुक्रवारी, २८ मार्च रोजी न्यायाधीश सुंदर मोहन यांच्यासमोर या प्रकरणाचा तातडीने सुनावणी व्हावी अशी याचिका कुणाल कामराच्या वकिलांनी केली होती. हायकोर्टाने या याचिकेवर दुपारी सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे. स्टँडअप ॲक्टमध्ये केलेल्या टिप्पण्यांसाठी कुणाल कामराला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचे त्याच्या वकिलांनी हायकोर्टाला सांगितले.

कुणाल कामराचे वकील व्ही. सुरेश यांनी न्यायमूर्ती सुंदर मोहन यांच्यासमोर तातडीने सुनावणीसाठी याचिका सादर केली. व्ही. सुरेश यांनी गुरुवारी रात्री उशिरा हायकोर्टा ई-फायलिंग सिस्टमद्वारे याचिका दाखल केली होती. “माझ्यावर लावलेल्या गुन्ह्यांमध्ये मी निर्दोष आहे आणि तक्रारदाराने केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार वापरल्याबद्दल कलाकाराला त्रास देण्यासाठी आणि धमकावण्यासाठी दाखल केलेल्या तक्रारीद्वारे मला या प्रकरणात गोवण्यात आले आहे,” असं कुणाल कामराने आपल्या याचिकेत म्हटलं आहे.

पुढील महिन्यात अनेक सार्वजनिक सुट्ट्या असल्याने अटक झाल्यास आंतरराज्यीय अटकपूर्व जामिनासाठी कुणाल कामराने अर्ज करुन सुनावणी घेण्याची विनंती केली होती. “मला आणि माझ्या जवळच्यांना जीवाला धोका पोहोचवण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. त्यामुळे ३१ मार्च रोजी मुंबईला गेल्यास माझ्या जीवाला धोका निर्माण होईल याची भीती वाटत आहे. मी म्हटंलेल्या गाण्यात कोणाचेही नाव घेतलेलं नाही,” असं कुणाल कामराने याचिकेत म्हटलं आहे.  

टॅग्स :कुणाल कामराएकनाथ शिंदेउच्च न्यायालयमुंबई पोलीस