Join us
Daily Top 2Weekly Top 5

चलो अमेरिका, गतवर्षी १० लाख भारतीयांना व्हिसा, २०२३ मध्ये रचला नवा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 13:44 IST

United States Of America: नुकत्याच सरलेल्या २०२३ या वर्षामध्ये अमेरिकेच्या देशभरातील ॲम्बसी व कौन्सुलेट कार्यालयांनी १० लाख ४० हजार भारतीयांना अमेरिकेचा व्हिसा देत नवा विक्रम रचला आहे. तसेच, व्हिसाच्या प्रतीक्षा कालावधीमधील विलंबदेखील कमी केल्याची माहिती ॲम्बसीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. 

मुंबई - नुकत्याच सरलेल्या २०२३ या वर्षामध्ये अमेरिकेच्या देशभरातील ॲम्बसी व कौन्सुलेट कार्यालयांनी १० लाख ४० हजार भारतीयांना अमेरिकेचा व्हिसा देत नवा विक्रम रचला आहे. तसेच, व्हिसाच्या प्रतीक्षा कालावधीमधील विलंबदेखील कमी केल्याची माहिती ॲम्बसीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. 

यानुसार, गेल्यावर्षी अमेरिकी व्हिसाच्या सर्वच श्रेणीतील व्हिसाला मोठ्या प्रमाणावर मागणी होती. २०२२ च्या तुलनेत २०२३ या वर्षात व्हिसासाठी ६० टक्के अधिक अर्ज दाखल झाले होते. या विक्रमी व्हिसांमुळे अमेरिकेसाठी देण्यात येणाऱ्या प्रत्येक दहा व्हिसामध्ये एका भारतीय व्हिसाचा समावेश आहे. २०२३ वर्षामध्ये जारी करण्यात आलेल्या व्हिसामध्ये सात लाख लोकांना बी १- बी २ श्रेणीतील व्हिसा मंजूर करण्यात आला आहे. तर अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या एक लाख ४० हजार विद्यार्थ्यांना व्हिसा जारी करण्यात आला आहे. 

गेल्या तीन वर्षांपासून भारतीय विद्यार्थ्यांना जारी करण्यात आलेल्या अमेरिकेच्या व्हिसामध्ये सातत्यपूर्ण वाढ नोंदली गेली आहे. अमेरिकेत शिक्षणासाठी येणाऱ्या अन्य देशांतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत भारतीय विद्यार्थ्यांची संख्या विक्रमी आहे. याखेरीज नोकरीसाठी अमेरिकेत गेलेल्या लोकांना व कुटुंबीयांना मिळून एकूण तीन लाख ८० हजार व्हिसा जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, कोविड काळामध्ये कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या व अन्य बंधनांमुळे व्हिसा जारी करण्याच्या कालावधीमध्ये वाढ झाली होती. हा कालावधी आता एक हजार दिवसांपासून २५० दिवस इतका खाली आला आहे.

टॅग्स :अमेरिकाभारत