साहेब, नाद खुळा हे खरे का?
By अतुल कुलकर्णी | Updated: October 12, 2025 10:00 IST2025-10-12T09:52:04+5:302025-10-12T10:00:15+5:30
...असेच परम सत्य आमच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांना उमगले आहे. आमचे परममित्र संजय राऊत यांना सकाळी सकाळी पत्रकारांशी बोलण्याचा नाद लागला आहे... मुलगा गृहराज्यमंत्री झाला तरी त्याची बाजू घेण्याचा रामदास कदम यांना लागलेला नाद... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करण्याचा नाद...

साहेब, नाद खुळा हे खरे का?
अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई, मा. निवडणूक आयुक्त नमस्कार, जय महाराष्ट्र -
प्रत्येकाला कशाचा तरी नाद असतो. नाद असल्याशिवाय आयुष्यात काही होऊ शकत नाही... ‘नाद’ हा शब्द संस्कृतमधून आला. संस्कृतात मूळ शब्द ‘नद्’ असा आहे. ध्वनी हा नाद या शब्दाचा सर्वाधिक शुद्ध अर्थ आहे. शंखनाद, तबल्याचा नाद, निसर्गाचा नाद ही शुद्ध भावना आहे. त्यात एक स्पंदन आणि जिवंतपणा आहे. भारतीय संगीत शास्त्रात नाद संगीताचा आत्मा मानला जातो. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात आणि शारंगदेवाच्या संगीत रत्नाकर यात ‘नाद’ हा शब्द सन्मानाने येतो. जेव्हा काहीतरी टक्कर होऊन आवाज होतो तो ‘आहत नाद’ आणि जो अंतरात्म्यात, ध्यानात, शांततेत ऐकू येतो तो आत्म्याचा नाद..! म्हणजेच ‘अनाहत नाद’. नादब्रह्म म्हणजे नाद हेच परम सत्य आहे..!
असेच परम सत्य आमच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांना उमगले आहे. आमचे परममित्र संजय राऊत यांना सकाळी सकाळी पत्रकारांशी बोलण्याचा नाद लागला आहे... मुलगा गृहराज्यमंत्री झाला तरी त्याची बाजू घेण्याचा रामदास कदम यांना लागलेला नाद... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करण्याचा नाद... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रात्री तीन वाजेपर्यंत जागे राहण्याचा नाद... उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गेल्या काही महिन्यांपासून सतत हसण्याचा, हसवण्याचा नाद लागला आहे... (त्यात दादांना सकाळी ६ वाजता उठून उद्घाटने, दौरे करण्याचाही नाद...) उद्धव ठाकरे यांना सगळीकडे पन्नास खोके म्हणायचा नाद... मंत्री उदय सामंत यांना आपल्याच शिंदे सेना पक्षाचे नेमके काय होणार हे शोधण्याचा नाद... तर मंत्री प्रताप सरनाईक यांना रॅपिडोचा नाद लागला होता, आता राज्यातल्या बस स्थानकांचे काय करायचे या विचाराचा नाद लागला आहे...
मंत्री संजय शिरसाठ यांना कितव्या मजल्यावर फ्लॅट घेतला, त्याचे शूटिंग करून लोकांना दाखवण्याचा नाद... आ. विलास भुमरे यांना वीस हजार मतदार बाहेरून कसे आणले हे सांगण्याचा नाद... माणिकराव कोकाटे यांना विधानसभेत मोबाइलवर गेम खेळायचा नाद... मंत्री भरत गोगावले यांना खांद्यावर नॅपकिन टाकण्याचा नाद... तर खा. सुनील तटकरे यांना गोगावलेंच्या नॅपकिनची नक्कल करून दाखवण्याचा नाद... एवढेच कशाला, आशिष शेलारांना उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर टीका करण्याचा नाद... शंभूराज देसाई यांना जिल्ह्यात गाडीवर सायरन वाजवत फिरण्याचा नाद... गणेश नाईक यांना एकनाथ शिंदे यांच्या विरोधात तर खा. नरेश मस्के यांना गणेश नाईकांच्या विरोधात बोलण्याचा नाद... काही नेत्यांना रोज गांधीजींचे फोटो गोळा करण्याचा नाद... काही नेत्यांना गोळा केलेले फोटो स्वहस्ते वाटण्याचा नाद... काहींना रंगीत पाण्याचा, तर काहींना रात्रीच्या वेळी ढोलकी ऐकण्याचा नाद...
आता एवढे नाद आजूबाजूला असताना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला असे जर मंत्री म्हणाले असतील तर त्यात काय चुकले? अहोरात्र काबाडकष्ट करून जर शेतीतून काही उत्पन्नच मिळत नसेल... धो-धो पावसाने त्याची शेती नष्ट करून टाकली असेल तर त्याला आत्महत्येशिवाय दुसरा काय नाद असू शकतो? लोकभाषेत नाद लागला हा वाक्प्रचार अनेक अर्थाने वापरला जातो. तिथे मंत्र्यांनी वापरला म्हणून काय झाले? शेतकऱ्यांनी गावात नदी मागितली किंवा विमानतळ मागितले तरीही आश्वासन देण्याचा नाद आम्हा सगळ्यांना असल्याचे खुद्द मंत्री महोदयांनी सांगितले आहे...
हे सगळे तुम्हाला लिहिण्याचे कारण असे की, असे नाद आचारसंहितेत बसतात का? बसत असतील तर कारवाई असते का? आचारसंहितेत बसत नसतील तर हा नाद खुळा म्हणून सोडून द्यायचे का..? आपण यथायोग्य मार्गदर्शन कराल म्हणून आपल्याला हे पत्र लिहिले... निवडणुका घेण्यासाठी आपल्याला शुभेच्छा...
- तुमचाच, बाबूराव