Join us  

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घराबाहेर शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 1:05 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर एका व्यक्तीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वृत्त समोर आले आहे.

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर एका व्यक्तीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वृत्त समोर आले आहे. आत्महत्या करणारी व्यक्ती ही मुंबईतील रहेजा कॉलेजमधील शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे. रहेजा कॉलेजने आपल्यावर अन्याय केला, असा आरोप करत या शिक्षकाने 'कृष्णकुंज'बाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

रहेजा कॉलेजमध्ये ते कला विषयाचे शिक्षक आहेत. पण कॉलेज प्रशासन हे विभाग बंद करत आहे. कला विभागासाठी मागील चार वर्षांपासून आपला लढा सुरू आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही कोणताही उपयोग झाला नाही, असा आरोपही या शिक्षकाने सुसाईड नोटमध्ये केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपले आवडते नेते असून त्यांना कलेविषयी जाण आहे. राज यांच्यामार्फत आपल्या लढ्याला आवाज मिळेल, यासाठी त्यांच्या घराबाहेर आत्महत्या करणार असल्याचं शिक्षकाने नोटमध्ये लिहिले होते. यानुसार विषारी द्रव्य प्राशन करून या शिक्षकानं आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, स्थानिक व पोलिसांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तातडीनं आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या शिक्षकाला हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल केले.  आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र डॉक्टरांच्या देखरेखीखाली ICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  

 

टॅग्स :आत्महत्याराज ठाकरेशिक्षक