महाविद्यालयांचा 'कट ऑफ' वाढणार; अकरावीच्या सर्व शाखांत प्रवेशासाठी चुरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 08:47 IST2025-05-14T08:47:48+5:302025-05-14T08:47:48+5:30

नव्वदीपार विद्यार्थी अधिक असल्याचा परिणाम

college cut off list to increased and competition for admission to all branches of 11th | महाविद्यालयांचा 'कट ऑफ' वाढणार; अकरावीच्या सर्व शाखांत प्रवेशासाठी चुरस

महाविद्यालयांचा 'कट ऑफ' वाढणार; अकरावीच्या सर्व शाखांत प्रवेशासाठी चुरस

अमर शैला, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई विभागाच्या दहावीच्या निकालाची टक्केवारी वाढली असतानाच दुसरीकडे तब्बल १७ हजार ८९५ विद्यार्थी १० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांमध्ये प्रवेशाकरिता मुंबईतील नामांकित महाविद्यालयांमध्ये यंदा प्रवेशासाठी चांगलीच चुरस रंगणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गेल्यावर्षी मुंबई विभागात १३ हजार ४३० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले होते. हे प्रमाण एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत ३.९ टक्के होते. यंदा मात्र हे प्रमाण एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत ५.३१ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. राज्य मंडळाबरोबरच सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाच्या निकालातही ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मुंबईतील नामांकित महाविद्यालयांत प्रवेशासाठी यंदा स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

गेल्यावर्षी कला शाखेसाठी सेंट झेविअर्स (९३.४), रूईया (९२.२), वझे-केळकर (८८.४), बिर्ला कॉलेज (८६.८) आणि रूपारेल कॉलेज (८५.८) या महाविद्यालयांचा 'कट ऑफ' अधिक होता, तर वाणिज्य शाखेसाठी पोदार (९४.४), तझे-केळकर (९२.४), एमसीसी (९२), केसी (९१.४) या महाविद्यालयांमध्ये चढाओढ होती. विज्ञान शाखेसाठी फादर अॅग्नल (९३.८), रुईया (९३.४), बिर्ला (९३), वझे-केळकर (९२.८) या कालेजांचा 'कट-ऑफ' सर्वाधिक होता.

आम्ही यशवंत

महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी ऑनलाइन जाहीर झाला. या निकालानंतर दादर येथील बालमोहन विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांनी शाळेत जमून यशाचा आनंद साजरा केला. यावेळी शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले. तर, विद्यार्थ्यांनी एकमेकांना पेढे भरवून जल्लोष सादर केला.

प्रवेशासाठी जागा तितक्याच आहेत. मात्र, निकालाची वाढलेली टक्केवारी आणि २० पेक्षा अधिक गुण मिळविणान्यांची संख्या पाहता प्रवेशासाठी चुरस वाढेल. त्यामुळे 'कट ऑफ' वाढण्याची चिन्हे आहेत. राजेंद्र शिंदे, प्राचार्य, सेंट झेवियर्स महाविद्यालय.

२० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यातून यंदाही प्रवेशासाठी स्पर्धा राहील. विनिता पिंपळे, प्राचार्या, पोदार महाविद्यालय.

राज्यात चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या स्थानी झेप

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा मुंबई विभागाचा निकाल ९५.८४ टक्के लागला. राज्यातील नऊ मंडळांमध्ये मुंबई विभाग तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईच्या निकालात १.९७टक्क्यांची वाढ झाली. गेल्यावर्षी मुंबईचा निकाल ९३.८७ टक्के लागला होता. नऊ मंडळांमध्ये गेल्यावर्षीच्या चौथ्या स्थानावरून मुंबईने तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

मुंबईच्या निकालाचा टक्का वाढला असला तरी राज्याचा सरासरी निकाल मात्र घसरला आहे. गेल्यावर्षी राज्याचा निकाल ९५.८१ टक्के लागला होता. त्यात घसरण होऊन यंदा हा निकाल ९४.१० टक्के लागला. राज्याच्या सरासरी निकालाच्या तुलनेत मुंबईचा टक्का मात्र यंदा अधिक आहे.

पश्चिम उपनगराची बाजी

मुंबईतून ३,३५,५०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील ३,२१,५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुंबई विभागात १,०३,०९४ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण झाले आहेत. तर द्वितीय श्रेणीतून १,०८,४८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबई विभागात सर्वाधिक निकाल मुंबईतील पश्चिम उपनगराचा लागला असून २६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सर्वांत कमी निकाल पूर्व उपनगराचा लागला आहे. पूर्व उपनगराचा निकाल ९४.३० टक्के लागला.
 

Web Title: college cut off list to increased and competition for admission to all branches of 11th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.