महाविद्यालय आणि विद्यापीठाची प्रश्नपत्रिका सेम टू सेम, विद्यापीठाच्या पेपर सेटर्सबद्दल प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 06:28 AM2019-11-29T06:28:12+5:302019-11-29T06:28:37+5:30

मुंबई विद्यापीठामार्फत मेकॅनिकल इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या मेटल टेक्नॉलॉजी विषयाची प्रश्नपत्रिका पिल्लई महाविद्यालयातल्या प्रश्नपत्रिकेशी मिळतीजुळती आढळली आहे.

College and University Question Paper Sem to Sem, Question paper about University Paper Setters | महाविद्यालय आणि विद्यापीठाची प्रश्नपत्रिका सेम टू सेम, विद्यापीठाच्या पेपर सेटर्सबद्दल प्रश्नचिन्ह

महाविद्यालय आणि विद्यापीठाची प्रश्नपत्रिका सेम टू सेम, विद्यापीठाच्या पेपर सेटर्सबद्दल प्रश्नचिन्ह

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठामार्फत मेकॅनिकल इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या मेटल टेक्नॉलॉजी विषयाची प्रश्नपत्रिका पिल्लई महाविद्यालयातल्या प्रश्नपत्रिकेशी मिळतीजुळती आढळली आहे. त्यामुळे विद्यापीठातील पेपर सेटर नेमके काय काम करतात, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

मुंबई विद्यापीठामार्फत २६ नोव्हेंबर रोजी मेटल टेक्नॉलॉजी विषयाचा पेपर पार पडला. तर, आॅक्टोबरमध्ये पिल्लई महाविद्यालयात पूर्वपरीक्षा झाल्या. हे दोन्ही पेपर सारखेच होते. त्यामुळे महाविद्यालयातील पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि विद्यापीठाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका सारखीच असेल तर विद्यापीठात नेमलेले पेपर सेटर नेमके काय काम करतात, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

पिल्लई महाविद्यालयांत १८ आॅक्टोबर रोजी याच विषयाची ८० गुणांची ३ तासांची परीक्षा पार पडली. या परीक्षेत विचारले गेलेलेच प्रश्न जसेच्या तसे २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या विद्यापीठाच्या परीक्षेतही विचारले गेले आहेत. काही प्रश्न तंतोतंत जसेच्या तसे आहेत, तर काही प्रश्नांच्या शब्दरचनेत किरकोळ बदल असून उत्तर मात्र सारखेच असेल अशी स्थिती आहे.

मात्र या परिस्थितीवरून तरी पेपर आधीच फुटला असल्याच्या तक्रारी विद्यार्थी यानिमित्ताने करीत आहेत. हुशार विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान यामुळे होत असल्याचे काही विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या प्रत्येक विभागात, अभ्यासक्रमनिहाय आणि विषयनिहाय ३ पेपर सेटर्सची समिती असते. यातील प्रत्येकाने एकत्रित बैठक घेऊन विद्यापीठ परीक्षेचा पेपर सेट करायचा असतो असा नियम आहे. मात्र जर एखाद्या महाविद्यालयातील पूर्व परीक्षेचा पेपर जसाच्या तसा विद्यापीठाची प्रश्नपत्रिका म्हणून येत असेल तर नेमके हे पेपर सेटर्स काय करतात, असा सवाल सिनेट सदस्य वैभव नरवडे यांनी उपस्थित केला आहे.

याआधीही अशा कितीतरी वेळा विद्यापीठांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये योगायोग दिसून आला; मात्र अद्याप विद्यापीठाकडून अशा अधिकारी आणि प्राध्यापकांवर काहीच कारवाई होत नाही. यामुळे हा निष्काळजीपणा वाढला असल्याचा आरोपही त्यांनी केला. यासंदर्भात विद्यापीठाकडे अजून तरी कोणी काही तक्रार केलेली नाही किंवा निदर्शनास आणून दिलेले नाही, असे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे म्हणणे असल्याचे सांगण्यात येत आहे.

नेहमी बोटचेपे धोरण ठेवल्याने असे प्रकार घडत आहेत. हुशार विद्यार्थ्यांवर हा एक प्रकारे अन्यायच आहे. हा प्रकार आम्ही विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे. वारंवार असे प्रकार घडू नयेत यासाठी विद्यापीठाने या प्रकरणी सर्व संबंधितांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. - वैभव नरवडे, सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ

Web Title: College and University Question Paper Sem to Sem, Question paper about University Paper Setters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.