Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुलाबा–वांद्रे–सीप्झ मेट्रो ३ चे ३.८१४ किमीचे भुयारीकरण पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 17:29 IST

मेट्रो-३ च्या मार्गातील हा १५ वा ‘ब्रेक थ्रु’ आहे.

मुंबई : कुलाबा–वांद्रे–सीप्झ या पहिल्या भुयारी मेट्रो-३ मार्गातील आझाद मैदान ते मुंबई सेंट्रल या ३.८१४ किमीचे भुयारीकरण आज शुक्रवारी पूर्ण झाले. यामुळे डाऊनलाईन बोगदा पूर्ण करणारी मेट्रो-३ प्रकल्पातील वैतरणा ही पहिली टीबीएम मशीन ठरली आहे. केवळ २० महिन्याच्या काळात वैतारणा-१ या टनेल बोअरिंग मशीनने हा महत्त्वपूर्ण पल्ला गाठला. जमिनीच्या २० मीटर खाली भुगर्भात बेसाल्ट आणि ब्रेसिया या कठीण दगडातून मार्गक्रमण करीत यशस्वीरित्या हे काम करण्यात आले. याकरिता २७२० सेगमेंट रिंगचा वापर करण्यात आला. 

मेट्रो-३ च्या मार्गातील हा १५ वा ‘ब्रेक थ्रु’ आहे. अतिशय वेगात आणि दिलेल्या वेळेत मेट्रो-३ या भुयारीमेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. एचसीसी – मॉस्मेट्रोस्ट्रॉय या समूहाद्वारे पॅकेज-२ अंतर्गत वैतरणा टीबीएम काम करीत आहे. या मोहिमेदरम्यान कित्येक आव्हानांना सामोरे जावे लागले. वैतरणा -१ च्या मार्गात अनेक १४ उंच इमारती, २८ ऐतिहासिक वारसा वास्तू आणि अतिशय जुन्या इमारतींचा समावेश होता. परंतू सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेऊन हे भुयारीकरण पूर्ण करण्यात आले.

         यासंदर्भात प्रतिक्रिया देताना मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे म्हणाल्या, “हे अतिशय आव्हानात्मक काम होते. परंतु पॅकेज-२ चे काम आम्ही दिलेल्या वेळेत पुर्ण केल्याने आमचा आत्मविश्वास दुणावला आहे.”        वैतरणा-१ हे टीबीएम ३.८१४ किमी अंतर पार करून मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकावर बाहेर निघेल .मेट्रो-३ मार्गिकेवरील मुंबई सेंट्रल मेट्रो स्टेशन मुंबई सेंट्रल डेपो, मुंबई सेंट्रल उपनगरी आणि मरीनलाईन रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना सुलभ सेवा प्रदान करेल. एमएमआरसीने आजपर्यंत, १७ टनेल बोरिंग मशीनचा वापर करून ३१ किमी भुयारीकरण पूर्ण केले आहे.

      या कार्यक्रमात अजॉय मेहता, मुख्य सचिव महाराष्ट्र शासन, अनिल कुमार गुप्ता, महाव्यवस्थापक, पश्चिम रेल्वे व पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :मेट्रो