लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आपल्या मनात २०१४ पर्यंत ठासून भरले होते की, ‘स्ट्राँग लीडर इज अ स्ट्राँग कंट्री’ पण हा चुकीचा विश्वास आपण मनात ठेवत आलो. मजबूत देश पाहिजे असेल, तर ‘मजबूर’ सरकार गरजेचे आहे. मजबूर म्हणजे एकदमच प्रॉब्लेमॅटिक नाही, पण मिलीजुली सरकार गरजेचे आहे, असे मत उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
लोकसभा निवडणुकीत पाचव्या टप्प्यात मुंबई, ठाणे आणि नाशिक परिसरातील लोकसभा जागांसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी बुधवारी लोकमत कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी, लोकमत व्हिडीओचे संपादक आशिष जाधव आणि डिजिटल टीमच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदारांना पुन्हा पक्षात घेणार नाही, तसेच ज्या भाजपने माझे वडील उद्धव ठाकरे यांच्यासाठी ‘नकली संतान’ असा शब्द वापरला त्या भाजपसोबतही आम्ही पुन्हा युती करणे शक्य नाही, असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी ठामपणे सांगितले.
आमचे हिंदुत्व सगळ्यांना घेऊन चालणारे
प्रचारादरम्यान आपल्या भाषणाला सुरुवात करताना उद्धव ठाकरे हे ‘जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो’ हा शब्दप्रयोग टाळून ‘जमलेल्या देशभक्तांनो’ असे संबोधताना दिसत आहे. यावरून होणाऱ्या टीकेला आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले. आम्ही गर्वाने सांगतो आम्ही हिंदू आहोत. हिंदुत्ववादी पक्ष आहोतच. पण मुस्लिम, शीख, ख्रिश्चन किंवा इतर धर्माचे जे मतदार असतील ते आमच्याकडे येणे काही गैर आहे का? आम्ही जी मते मागत आहोत, ती देशाच्या हितासाठी मागत आहोत. संविधान आणि लोकशाहीसाठी मागत आहोत. आमचे हिंदुत्व चूल पेटवणारे आणि त्यांचे हिंदुत्व घर पेटवणारे, अशा शब्दांत आदित्य यांनी भाजपचा समाचार घेतला.