मुंबई विमानतळावर पकडले २० कोटींचे कोकेन, मद्याच्या बाटलीतून कोकेनची तस्करी

By मनोज गडनीस | Updated: November 24, 2022 19:53 IST2022-11-24T19:52:32+5:302022-11-24T19:53:01+5:30

मुंबई विमानतळावर २० कोटींचे कोकेन जप्त करण्यात आले आहे.  

 Cocaine worth 20 crores has been seized at Mumbai airport  | मुंबई विमानतळावर पकडले २० कोटींचे कोकेन, मद्याच्या बाटलीतून कोकेनची तस्करी

मुंबई विमानतळावर पकडले २० कोटींचे कोकेन, मद्याच्या बाटलीतून कोकेनची तस्करी

मुंबई : आफ्रिकेतील लागोस या शहरातून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाने मद्याच्या दोन बाटल्यांतून आणलेले ३ किलो ५६ ग्रॅम वजनाचे कोकेन डीआरआयने जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत २० कोटी रुपये इतकी आहे. मद्याच्या बाटलीतून अंमली पदार्थांच्या झालेल्या या तस्करीच्या नव्या कार्यपद्धतीमुळे अधिकारी देखील चक्रावून गेले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लागोस येथून अदिस अबाबा मार्गे मुंबईत येणाऱ्या एका प्रवाशाकडे अंमली पदार्थ असल्याची माहिती केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर सापळा रचला होता.

माहितीनुसार, विमानातून उतरलेल्या एका प्रवाश्याच्या संशयास्पद हालचालीनंतर अधिकाऱ्यांनी त्याला थांबवून त्याच्या सामानाची झडती घेतली. मात्र, त्यात काही आढळून आले नाही. परंतु, या व्यक्तीकडे दोन मद्याच्या बाटल्या होत्या. या बाटल्यामध्ये द्रवरुपात कोकेन ठेवण्यात आले होते. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी या मद्याच्या बाटल्यांतील द्रव पदार्थाची तपासणी केली असता ते कोकेन असल्याचे आढळून आले. अशा पद्धतीने होणारी अंमली पदार्थाची तस्करी हा वेगळा आणि नवा मार्ग असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. त्याची तपासणी करणे अत्यंत कठीण आहे. ही नवीन कार्यपद्धती डीआरआयने गुरुवारी केलेल्या कारवाईद्वारे उजेडात आणली आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.


  

Web Title:  Cocaine worth 20 crores has been seized at Mumbai airport